साक्री येथील प्रकार

जिल्हय़ातील साक्री येथे एका नराधमाने शाळेच्या आवारातच चिमुरडीवर तिच्या मैत्रिणीसमोरच बलात्कार करण्याची घटना घडली. साक्रीतील समता नगरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीत शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडल्याचे उजेडात आले आहे. नऊ वर्षांच्या दोन विद्यार्थिनी शाळेच्या बाजूला लघुशंकेसाठी गेल्या असता अमजद शाह नशिरशाह (२५, आदर्शनगर, साक्री) या नराधमाने त्या मुलींना इमारतीच्या एका भागात नेऊन एकीवर बलात्कार केला. दुसरीचाही विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास दोघींना मारून टाकण्याची धमकी दिली. दोन्ही चिमुरडय़ा रडत रडत वर्गात परतल्यानंतर प्रकार उघडकीस आला. पालकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

त्या वेळी संतप्त जमाव जमला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.