बालकल्याण समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष

कर्जत येथील बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीवर लंगिक अत्याचार करून तिची गुजरातमध्ये विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला व बालकल्याण समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र १५ दिवसांनंतरही या प्रकरणाची कर्जत पोलिसांनी योग्य दखल घेतलेली नाही. तपास अधिकारी आणि कर्मचारी हे प्रकरण अतिशय असंवेदनशीलपणे हाताळत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून केला जात आहे.

कर्जत तालुक्यातील पंचशील नगरमध्ये राहणारी १६ वर्षांची मुलगी गेल्या १० सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी मुलीच्या आईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र सहा महिन्यांत तिचा तपास करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र १० मार्चला ती कर्जत येथे पुन्हा परत आली. दरम्यानच्या काळात तिच्यावर आधी नेरळ, नंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे शारीरिक अत्याचार करण्यात आले.

घरगुती कारणातून बाहेर पडलेल्या या मुलीच्या तिच्या परिचयातील एका महिलेनेच सुरुवातीला नेरळ येथे नेले. तिथे अज्ञात इसमाकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. नंतर अमली पदार्थाचे सेवन करण्यास भाग पाडून तिच्यावर आणखीन एकाने अत्याचार केले. यानंतर तिला गुजरात येथील अहमदाबाद येथे नेऊन एका इसमास विकण्यात आले. तिथेही तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. दोन महिन्यांनंतंर तिला आणखीन एका इसमाकडे विकून अत्याचार केले गेले. रोजच्या अत्याचाराला कंटाळून तिने तेथून पळ काढला आणि कर्जत गाठले. आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

बालकल्याण समितीने १२ मार्चला या प्रकणाची चौकशी करण्याचे तसेच मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच मुलीला शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची २३ मार्चला महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाइल्ड लाइन यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी आपले म्हणणे ऐकून घेतले नाही. तूच खोटे बोलतेस, असे म्हणत मारहाण केल्याचा पीडित मुलीने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप खुद्द महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी आणि दिशा केंद्राचे जिल्हा समन्वयक अशोक जंगले यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या स्मरणपत्रात पोलीस अतिशय असंवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘बालकल्याण समितीच्या निर्देशानंतरही पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. उलट पीडित मुलीवर तू खोटे बोलत आहेस असे आरोप केले व मारहाण केली. हे प्रकरण गंभीर असून रायगड पोलीस अधीक्षकांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, कर्जत पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास काढून महिला अधिकाऱ्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक व्हावी अशी आमची मागणी आहे.’  – अशोक जंगले, जिल्हा समन्वयक, दिशा केंद्र