गुजरातपेक्षा महाराष्ट्र राज्य उद्योग, शिक्षण व एकूण मानव विकासदरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु खोटय़ा विकासावर गुजरातचे मॉडेल तयार  करून नरेंद्र मोदी हे देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या खोटय़ा दाव्याला तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यात बलवडी व अन्य भागात पाटील यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या विकासाच्या मुद्दय़ावर मोदी व संघ परिवारावर टीकास्त्र सोडले. तसेच महायुतीचे उमेदवार सदाशिव खोत यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे, काँग्रेसचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, माढय़ात राष्ट्रवादीच्या विरोधात उभा असलेला उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा असून सांगलीतील वाळव्यात राहणाऱ्या या उमेदवाराने यापूर्वी धुळे जिल्ह्य़ात दूधसंस्थेच्या माध्यमातून घोटाळा केला होता. यात त्याला कारागृहात बसावे लागले होते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला मतदारांनी थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी देशात धर्माध शक्तीच्या हातात सत्ता न जाता पुन्हा धर्मनिरपेक्ष शक्तीकडेच देशाची सूत्रे सुरक्षितपणे राहावीत म्हणून धर्माध शक्तींना मतदारांनी दूर करावे, असे आवाहन केले.