जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहापैकी चार बाजार समित्यांमध्ये प्रस्थापितांनी आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले, तर दोन बाजार समित्यांमध्ये विरोधकांनी बाजी मारली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या आपलं पॅनलने १५ जागांवर विजय संपादन करत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. विरोधी स्थायी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या शेतकरी विकास पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. कळवण बाजार समितीवर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागा मिळवत आमदार जे. पी. गावित यांच्या किसान विकास पॅनलचा धुव्वा उडवला. त्यांच्या पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत माजी आमदार ए. टी. पवार आणि जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सभापती धनंजय पवार यांच्या सत्ताधारी विकास पॅनलने हे यश संपादित केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे बाहुबली नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या शिवनेरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत प्रतिस्पर्धी आ. पंकज भुजबळ व माजी आमदार अनिल आहेर यांच्या किसान विकास पॅनलचा धुव्वा उडविला. किसान विकास पॅनलला केवळ तीन जागा मिळवता आल्या.
सिन्नर बाजार समितीत भाजपवासी झालेले माजी आमदार माणिक कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलने १२ जागा पटकावत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या परिवर्तन पॅनलला पराभूत केले. वाजे यांच्या पॅनलच्या पदरात केवळ सहा जागा पडल्या. येवला बाजार समितीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रगती पॅनलने १२ जागा पटकावत पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व माजी आमदार मारोतराव पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला पाच जागा मिळाल्या. भुजबळांनी बाजार समिती आपल्या ताब्यात राखली. चांदवड बाजार समितीत आ. राहुल आहेर व आत्माराम कुंभार्डे यांच्या परिवर्तन पॅनलने १३ जागांवर विजय प्राप्त करत २० वर्षांनंतर खऱ्या अर्थाने सत्तेत परिवर्तन घडवून आणले. माजी आमदार शिरीष कोतवाल व उत्तमबाबा भालेराव यांच्या शेतकरी विकास पॅनलला पाच जागा मिळाल्या.