माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते हे कृतघ्न व खोटे बोलत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या आयुष्यात तब्बल १३ वर्षे मंत्री व इतर पदे भोगणारे पाचपुते, पक्षाने आपल्यावर अन्याय केला असे म्हणतात याचे आश्चर्यच वाटते, पक्षाचे नेते शरद पवार यांना ते पांडुरंग म्हणायचे, मग हा भक्त पांडुरंगावर कसा कोपला? असा टोला पालकमंत्री मधुकर पिचड यांनी पाचपुते यांना लगावला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी हा टोला लगावला. पाचपुते यांना आपण शिव्या दिल्या, असे ते म्हणाल्याचे आपण वृत्तपत्र व वाहिन्यांवरुन वाचले, ऐकले परंतु आपण पाचपुते यांना फोन केलाच नाही, त्यांनीच मला फोन केला, फोनवर आपण त्यांना केवळ तुम्हाला आदिवासी जीवनाची सर्व माहिती असताना तुम्ही धनगर समाजाला कसा पाठिंबा व दिला व आदिवासी समाजाशी का प्रतारणा केली, असेच त्यांना म्हणालो. मी आदिवासी समाजाचा आहे, अदिवासी खोटे बोलत नाहीत, ते सुसंस्कृत असतात, मी अनेक जबाबदार पदांवर काम केले, माझ्या संपर्कात आलेला कोणीही मी शिवीगाळ करतो, असे सांगणार नाही, असा दावा, पिचड यांनी केला.
पाचपुते यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये आ. प्रकाश शेंडगे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. भावना गवळी, आ. सुधीर मुनगंटीवार, खा. हंसराज अहिर, खा. प्रतापराव जाधव, खा. प्रतापराव सोनवणे यांना पत्र पाठवून धनगर हे आदिवासी नाहीत, धनगड व धनगर एक नाहीत, स्पेलिंगची चूक झालेली नाही, धनगरांचा अनुसूचित जातीत समावेश करता येणार नाही, असे स्पष्टपणे कळवले होते, तेच पाचपुते आता धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण द्या अशी मागणी कशी करु शकतात, याचे आश्चर्य वाटल्यानेच त्याची विचारणा केल्याचा राग पाचपुते यांना आल्याचे दिसते, असे पिचड म्हणाले.
‘पाचपुते आऊट, शेलार इन’
आ. बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पाचपुते यांच्यावर आरोप करत शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती व श्रीगोंद्यातुन निवडणुक लढवण्याचे जाहीर केले होते, तेही भाजप प्रवेशासाठी त्यावेळी इच्छुक होते. परंतु आता बदलत्या पाश्र्वभूमीवर शेलार पुन्हा राष्ट्रवादीच्या जवळ आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शेलार हे दिवसभर पालकमंत्री पिचड यांच्यासमवेत त्यांच्या गाडीत होते. पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी ‘शेलार यांना मी घेऊन चाललो आहे’ असे सूचक वक्तव्यही करत, त्यांना गाडीत घेऊन गेले.