राज्यातील देवेंद्र फडणविसांचे सरकार म्हणजे फक्त घोषणांवर घोषणा करणारी जणू ‘आकाशवाणी’ आहे, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले.

सोलापुरात मंगळवारी एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार कडू यांनी फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा गाजावाजा कितीही केला जात असला तरी त्यात भ्रष्टाचार झाला असून त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस हे काहीही बोलत का नाहीत, असा सवाल आमदार कडू यांनी केला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांसाठी जेवढा निधी खर्च झाला, त्याच्या चारपट शेतक ऱ्यांना लुटण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकीकडे जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या तुरीला, उसाला, कापसाला, डाळिंबाला, द्राक्षाला भाव नाही. साऱ्याच शेतीमालाचे भाव पडले आहेत. शेतीमालाचे भाव पाडून शेतक ऱ्यांना लुटण्याचे सत्र सुरूच आहे. सरकार म्हणते शेतीमालाचे उत्पादन इंचा-इंचाने वाढवा आणि दुसरीकडे शेतीमालाचे भाव फुटा-फुटाने कमी होत आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकदातरी तोंड उघडून बोलावे, अशा शब्दात आमदार कडू यांनी चिमटे काढले.

शेतकरी हा शेतकरी म्हणूनच सन्मानाने जगला पाहिजे. त्याला जाती-पातीच्या व धर्माच्या बंधनात अडकावण्याचा प्रयत्न होत आहे. या माध्यमातून शेतक ऱ्याला गुलामगिरीत ढकलण्याचा प्रयत्न होत असून त्या विरोधात आपला लढा सुरू असल्याचेही आमदार कडू यांनी नमूद केले.