औरंगाबाद जिल्हय़ातील गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशास खासदार चंद्रकांत खैरेही अनुकूल असल्याची माहिती आहे. १५ ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर सेनेत प्रवेश करण्याच्या मानसिकतेत ते आहेत. या मतदारसंघातून सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पाश्र्वभूमीवर बंब यांचा सेनेतील प्रवेश व खैरे यांची अनुकूलता यामुळे दानवे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
आमदार बंब शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत असेल, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना खैरे म्हणाले. गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीला इच्छुक सेनेतील नेत्यांची यादी मोठी आहे. उमेदवारीसाठी अगदी हाणामारीपर्यंत या मतदारसंघात वाद झाले होते. या पाश्र्वभूमीवर बंब यांच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे जय-पराजयाची गणिते नव्याने मांडली जात आहेत. या अनुषंगाने बोलताना आमदार बंब म्हणाले, की मी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहे. ज्या पद्धतीने प्रश्न मांडले, मग तो जायकवाडीचा असो किंवा दुष्काळाच्या चारा छावण्यांचा, त्याचा सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी एखाद्या पक्षात जावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सध्या त्यांच्यासमवेत बैठका घेत आहे. त्यातून जे ठरेल, त्यावर १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ.
जिल्हाप्रमुख दानवे व खासदार खैरे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा नेहमीच असते. त्यामुळे गंगापूर मतदारसंघातून दानवे यांना उमेदवारीसाठी खैरे सहकार्य करणार की बंब यांना पक्षात प्रवेश देणार, याकडे सेनेतील नेत्यांचे लक्ष लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या अनुषंगाने बोलणे झाले नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात आमदार बंब कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या जवळ असल्याचे सांगितले जात असे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बंब यांना काँग्रेसमध्ये घेण्यास प्रयत्न केले होते.