दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांना सरकारी कामात अडथळा आणि बेकायदा जमाव जमवल्याच्या आरोपावरून न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे कदम यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यात दप्तर दिरंगाई होत असल्याबद्दल जाब विचारण्यासाठी ते कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयात गेले होते. तेथे तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदम यांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे समाधान न झालेल्या कदम यांनी गेडाम यांच्यावर खुर्ची उगारून हल्ल्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनीही तेथे गोंधळ व आरडाओरडा केला, अशीतक्रार गेडाम यांनी पोलिसांकडे नोंदवली होती.