सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहोळचे राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांनी स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी हजारो समर्थकांसह मोहोळ पोलीस ठाण्यावर गेले असता तेथे गोंधळ होऊन पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली. यावेळी कदम समर्थक व पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाली. यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर पोलीस लाठीमारात आमदार कदम यांच्यासह सुमारे २५ समर्थक जखमी झाले.

सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर मोहोळ येथे पुलाखाली मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात आली होती. परंतु ही जाळी आमदार कदम यांच्या सांगण्यावरून जेसीबी यंत्राच्या साह्य़ाने परस्पर काढण्यात आल्यामुळे आमदार कदम यांच्यासह तिघाजणांविरुध्द मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून केल्याचा राग मनात धरून आमदार कदम हे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत स्वत: अटक करवून घेण्यासाठी शनिवारी दुपारी हजारो समर्थकांसह मोहोळ पोलीस ठाण्यावर गेले. पोलिसांनी या अटक मोर्चाला परवानगी नाकारली होती.

पोलीस ठाण्यासमोर कदम समर्थकांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत गोंधळ घातला व थेट दगडफेक सुरू केली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धोत्रे, धनाजी झळक व धनंजय ढोणे या तिघा पोलीस अधिकाऱ्यांसह १७ पोलीस जखमी झाले.