नागपूर येथे इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनी आज एकत्रितपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळया पक्षांच्या आमदारांनी ही मागणी जोरकसपणे रेटली.
आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी या आमदारांनी नागपुरात आयआयएम सुरू करण्याची मागणी करीत विधिमंडळाच्या पाय-यांवर निदर्शन केली. याबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, गेल्या ६०-६५ वर्षांपासून विदर्भ शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात विदर्भात आयआयएम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. आज नवीन जमीन अधिग्रहण कायदा कडक झाला असल्याने नवीन जमीन ताब्यात घेणे अत्यंत कठीण झाले आहे. मात्र, नागपूरजवळील मिहानमध्ये ही जागा उपलब्ध असून नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २०० एकर जागा प्रस्तावित केली आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने तात्काळ संसाधने व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या शैक्षणिक सत्रापासून  नागपुरात आयआयएम सुरू करणे शक्य आहे. सरकारला या संदर्भात आवाहन करण्यासाठी आज निदर्शने करण्यात आली, असे ते म्हणाले. भाजपचे डॉ. सुनील देशमुख, आकाश कोंडाकर, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, अमित झनक तसेच इतर आमदार या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.