मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील ‘परतीचा पाऊस’ भाजपसाठी तापदायक ठरत असल्याचा टोला या व्यंगचित्राच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या वापरावरुन भाजपवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

पेट्रोल- डिझेलचे वाढते दर, महागाई, आश्वासनांची पूर्तता करण्यात येणारे अपयश यामुळे मोदी सरकारविरोधात देशभरात नाराजी आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. ‘परतीचा पाऊस’ असे या व्यंगचित्रात म्हटले असून सोशल मीडियावरील टीकेने अमित शहा, नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांची बिकट अवस्था झाल्याचे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. महात्मा गांधींजींच्या जयंतीनिमित्तही राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले होते. ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक त्यांनी या व्यंगचित्राला दिले होते.

राज ठाकरेंचे व्यंगचित्र हे सध्या चर्चेचा विषय ठरत असून व्यंगचित्रांमुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकारविरोधात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली असून मोदी सरकारच्या धोरणाचा त्यांनी भाषणांमधून समाचारही घेतला होता.