हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहे असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आणीबाणीच्या काळात देशातील लेखक, पत्रकार एकत्र आले होते. मग आता ही सर्व मंडळी कुठे गेली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या ‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकार फक्त घोषणाबाजी करत असून जाहिरातबाजीवर पैशांची उधळपट्टी होत असल्याची टीका त्यांनी केली. हिंदीच्या सक्तीवरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. हिंदीची सक्ती का केली जात आहे?.  हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदी भाषा वाईट नाही. कोणतीही भाषा ही नेहमी चांगलीच असते. पण त्याची सक्ती करणे अयोग्य आहे असे त्यांनी नमूद केले. माझे वडील उर्दू उत्तम लिहायचे आणि बोलायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. पुढील १५ ते २० वर्षात मराठवाड्याचे वाळवंट होईल अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली. शौचालयासाठी सरकार जाहिरातबाजी करते. पण पाण्याची सोय नसताना शौचालय बांधून काय उपयोग ? आधी पाण्याची सोय केली पाहिजे असे ठाकरेंनी सांगितले. हे सरकारदेखील आधीच्या सरकारसारखे फक्त थापा मारत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

प्रसारमाध्यमांवरही राज ठाकरेंनी टीका केली. जीएसटीविरोधात गुजरातमधील व्यापारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. पण या आंदोलनाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या नाही. केंद्र सरकारविरोधातील आंदोलनावर माध्यमं गप्प का होतात असा सवाल त्यांनी विचारला. आणीबाणीच्या काळात केंद्र सरकारविरोधात लेखक, पत्रकार एकत्र आले होते. सर्वांनी सरकारविरोधात लिखाण सुरुच ठेवले होते. अमेरिकेतही ट्रम्प निवडून आले. ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीवर व्हाईट हाऊसमध्ये बंदी आहे. पण त्यानंतरही सीएनएन वृत्तवाहिनीच्या ट्रम्पविरोधी भूमिकेत बदल झालेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.