नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसे उमेदवाराच्या प्रचारात तटस्थ राहणाऱ्या पक्षाच्या समस्त नगरसेवकांची सोमवारी राज ठाकरे यांनी मुंबईत झाडाझडती घेतली. मनसे उमेदवाराच्या प्रचारात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मनसेच्या सर्व नगरसेवकांना मुंबईत पाचारण करून राज यांनी नेमके काय साधले, याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेने डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक शहरात मनसेचे तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता हाती असल्याने या जागेसाठी खुद्द राज यांनी विशेष जोर लावला आहे. परंतु, पक्षाच्या काही नगरसेवकांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारल्याच्या तक्रारी राज यांच्याकडे गेल्या होत्या. त्याची दखल घेत राज यांनी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्यासह पक्षाच्या ४१ नगरसेवकांना मुंबईत बोलावून घेतले. ही सर्व मंडळी भल्या सकाळी बसने मुंबईच्या दिशेने रवाना झाली. राज यांनी महिला व पुरुष नगरसेवकांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रचारात तुम्हाला काय अडचणी येत आहेत, आपापल्या प्रभागात प्रभावीपणे का प्रचार केला जात नाही, प्रचारात सक्रिय न होण्यामागे काय कारण आहे असे वेगवेगळे प्रश्न विचारत त्यांनी नगरसेवकांना धारेवर धरले. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या विजयासाठी सर्वानी शर्थीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांबाबत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही राज यांनी सुनावल्याचे सांगण्यात येते. महिला नगरसेविकांनी मात्र असे काही घडले नसल्याचे सांगितले. काही नगरसेविकांनी निवडणूक काळात झोपडपट्टय़ांमध्ये विरोधी उमेदवाराकडून मोठय़ा प्रमाणात पैसे वाटप केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीत विरोधकांनी असे पैसे वाटप केले होते, तरी तुम्ही निवडून आलात. त्याचप्रमाणे यंदाही पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची दक्षता घ्या, अशी सूचना केली. जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात असताना राज यांनी समस्त नगरसेवकांना मुंबईत बोलावून प्रचाराचा महत्त्वपूर्ण दिवस वाया घालविण्याची प्रतिक्रिया मनसेच्या गोटात व्यक्त होत आहे.