गेल्या वेळी दापोली विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित दहा हजारांचा पल्ला पार करत तिसरा क्रमांक पटकावणारी नवखी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाही आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील शिवसेनेकडूनच तसेच राष्ट्रवादीच्या नाराज घटकांकडूनच मनसेला पाठबळ मिळण्याचे संकेत असून, प्रमुख पक्षांच्या उमेदवार निवडीनंतरच खेड तालुक्यातील शिवसेना नेत्यांची भूमिका स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सूर्यकांत दळवी यांचे नाव इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्गज शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्या विरोधात बंड पुकारून सर्वानाच धक्का दिला होता. त्यावेळी आमदार सूर्यकांत दळवी यांनी मात्र गीते यांना मोलाची साथ देऊन आगामी विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे दाखवून दिली. त्यामुळे रामदास कदम यांच्या स्थानिक नेतृत्वाला एका अर्थी आव्हानच मिळाले. या रणनीतीमुळे मतदारसंघातील दापोली विरुद्ध खेड अशा प्रांतवादाला शिवसेनेमध्ये मोठय़ा प्रमाणात खतपाणी मिळाले आहे. त्याचे धक्के अर्थातच गेली पाच वष्रे आमदार सूर्यकांत दळवी यांना बसत आहेत.
 या पाश्र्वभूमीवर खेडमधील मनसेचे वलयांकित नेते वैभव खेडेकर यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतल्यास खेड तालुक्यातील शिवसेना कार्यकत्रे दळवी यांच्याऐवजी खेडेकर यांना अनुकूल राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, दापोली विरुद्ध खेड अशा राजकीय िहदोळ्यामध्ये राष्ट्रवादीचे अनुक्रमे किशोर देसाई आणि संजय कदम यांच्यातील अहमहमिकाही सध्या रंगली आहे. हे दोघेही निवडणुकीसाठी अतिशय आग्रही असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचा पेच निर्माण होणार, यात शंकाच नाही. त्यात खेड तालुक्याला कौल मिळाल्यास दापोलीतील किशोर देसाई समर्थक साहजिकच नाराज होतील. हीच परिस्थिती अतिमहत्त्वाकांक्षी संजय कदम यांच्या समर्थकांबाबतही निर्माण होऊ शकते. पण हे दोघेही आमदार सूर्यकांत दळवी यांना अनुकूलता दाखवण्याची शक्यता धूसर आहे.
 साहजिकच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होण्याची शक्यताच अधिक आहे. अर्थात हा फायदा स्वत:च्या झोळीत पाडून घेण्याचा प्रयत्न मनसेकडून यंदा पुरेपूर होईल, असा अंदाज आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.