आगामी विधानसभा निवडणुका बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अचानक सक्रीय झाले असून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे संभाव्य उमेदवार डॉ.अनिल बुजोणे यांनी केले.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होत असून विविध पक्ष व अनेक इच्छुक उमेदवार अचानक सक्रीय झाले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतली आहे.
रविवारी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला, तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हा मुलाखतींचा कार्यक्रम होत नाही तोच मनसेचे वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डॉ.अनिल बुजोणे अचानक सक्रीय झाले असून त्यांनी मागे पुढे न बघता मुसळधार पावसात ४० गाडय़ांच्या ताफ्यासह हा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
विशेष म्हणजे, या मोर्चात शेतकरी बांधवांपेक्षा मनसेचे कार्यकर्ते व वाहनांचीच गर्दी अधिक दिसत होती. भर पावसात दुष्काळाचा मोर्चा काढल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.
कधीकाळी शिवसेनेत सक्रीय असलेले डॉ. बुजोणे दर पाच वर्षांंनी विधानसभा निवडणुका आल्या की, अचानक सक्रीय होतात. एखाद्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाही, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. त्यात त्यांचा पराभव होतो आणि पुन्हा ते अचानक बेपत्ता होतात. यानंतर पुन्हा पाच वर्षांने विधानसभा निवडणुकीचे निमित्ताने लोकांसमोर येतात.
 गेल्या वीस वर्षांंपासून डॉ.बुजोणे याच पध्दतीने राजकारणात सक्रीय आहेत. शिवसेनेत सक्रीय असतांना उमेदवारी मिळाली असती तर ते कदाचित निवडूनही आले असते. कारण, दहा ते पंधरा वर्षांपूर्वी त्यांचे वरोरा मतदारसंघात चांगले काम होते, परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकारणातील व्यक्ती, प्रवृत्ती बदलल्या आहेत. आता निवडणुकीला दोन महिन्यांचा अवधी असतांना पुन्हा एकदा डॉ.बुजोणे सक्रीय झाले आहेत.
दुष्काळाचे निमित्त समोर करून त्यांनी शेतकरी बांधवांसाठी आपण झटत आहोत, असा आव आणत मोर्चा काढला खरा, परंतु त्यातीलच काही शेतकऱ्यांनी डॉक्टर साहेब गेल्या वर्षी ओला दुष्काळ पडला तेव्हा तुम्ही कुठे गेला होता, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. केवळ निवडणुका आल्या की सक्रीय व्हायचे आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा अज्ञातवासात जायचे, असेच काहीसे डॉ.बुजोणे करीत आहेत. त्यामुळे पाच वर्ष सक्रीय राजकारण करा आणि त्यानंतरच मतदारांच्या समोर जा, असा सल्ला त्यांना शेतकऱ्यांनी दिला आहे.