प्रकल्पांच्या नावाखाली शेतजमिनींची खरेदी करून प्रकल्प न उभारणाऱ्या कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना तातडीने परत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. अन्यथा जिल्ह्य़ात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. जिल्ह्य़ात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी केलेल्या हजारो एकर शेतजमिनी वापराविना पडून असल्याचे दाखले मनसेच्या वतीने या वेळी सादर करण्यात आले.
मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या प्रतिनिधी मंडळातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या अनुपस्थितीत तहसीलदार अजित नराळे यांनी हे निवेदन स्वीकारले.
औद्योगिकीकरणाच्या नावाखाली रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकडून हजारो एकर जमिनी कवडीमोल किमतीत घेण्यात आल्या होत्या. परंतु यापकी शेकडो एकर जमिनींवर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभा राहिलेला नाही. शेतकऱ्यांना त्या कसताही येत नाही. त्यामुळे या जमिनी पडून आहेत. नियमानुसार औद्योगिक कारणांसाठी घेतलेल्या जमिनीवर १५ वर्षांत औद्योगिक  प्रकल्प उभा राहिला नाही तर ती जमीन मूळ मालकांना परत करायला हवी. तसे झालेले नाही. औद्योगिक कारणांसाठी जमिनी घेऊन त्या हडप करण्यात आल्या आहेत, असा आरोप गोवर्धन पोलसानी यांनी केला.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जमिनी उद्योजकांनी एका कंपनीच्या नावाने खरेदी केलेल्या जमिनी परस्पर दुसऱ्या कंपनीला विकल्या आहेत. शेतकऱ्यांकडून कमी भावाने जमिनी विकत घ्यायच्या आणि जास्त किमतीत त्या दुसऱ्याला विकायच्या, असा धंदा काहींनी सुरू केला आहे. याची चौकशी करण्यात यावी. ज्या जमिनी पड आहेत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी मनसेची मागणी असल्याचे पोलसानी यांनी सांगितले.
खालापूर तालुक्यातील माजगाव येथील अरुणकुमार किसनकुमार, कुसुमदेवी केडिया, संजय किसनकुमारी केडिया यांनी घेतलेल्या जमिनी, लोहोप येथील मे. मेटािझग इंडिया प्रा. लि., ढेकू येथील मे. सुनील इंटरप्रायझेस, ढेकू येथील शहा बेक्टर अ‍ॅण्ड सन्स यांनी औद्योगिक कारणांसाठी घेतलेली जमीन कित्येक वर्षे पडीक आहे.
दहिवली येथील जमीन श्री फार्मासिटीकल अ‍ॅण्ड केमिकल प्रा. लि. यांनी खरेदी केलेली जमीन मे. उत्तम गॅल्वा स्टील लि. यांना विकली आहे. ढेकू येथील मे. सुनील एंटरप्रायजेस यांनी विकत घेतलेली जमीन गम्प्रो कंपनीला विकली आहे. मे. शहा बेक्टर अ‍ॅण्ड सन्सने घेतलेली जमीन ईस्टर्न अ‍ॅग्रो कंपनीला विकली आहे. मे. साई इंडस्ट्रीज इस्टेटने सम्राट वायर्सला जमीन विकली आहे. मे. गान्रेट कन्स्ट्रक्शनने ढेकू येथील जमीन अनेकांना विकली आहे. इतरही कंपन्यांनी जमिनी घेऊन त्या परस्पर दुसऱ्या कंपन्यांना विकल्या आहेत. हे सगळे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
येत्या आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाने याबाबत काही कार्यवाही केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करेल, असा इशारा गोवर्धन पोलसानी यांनी दिला आहे.