शेतीसाठीचे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरणाऱ्या इंडियाबुल्सच्या मुंबईतील कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी अमरावतीतही मनसे कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.
रविवारी रात्री येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. मनसेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास इंडियाबुल्सच्या येथील कार्यालयात शिरून तोडफोड केली आणि घोषणाबाजी करून हे कार्यकर्ते पसारही झाले.
सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता कार्यकर्ते आत शिरले. यावेळी कार्यालयात तेथील कर्मचारी उपस्थित होते. तोडफोड सुरू होताच त्यांनी एका कक्षात आश्रय घेतला होता.
या हल्लाप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र मुंबईपाठोपाठ इंडियाबुल्सच्या येथील कार्यालयावरही हल्ला झाल्याने मनसेचे कार्यकर्ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हल्ल्याप्रकरणी मनसेचे पाच कार्यकर्ते अटकेत
 मुंबई : ‘इंडियाबुल्स’ कंपनीच्या सेनापती बापट मार्गावरील कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकरणी आणखी ११ अज्ञात व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आतापर्यंत पाच जणांची ओळख पटविणे पोलिसांना शक्य झाले. मुनाफ ठाकूर (३२), इरफान आगवान (२५), सागर सोलकर (२२), सागर जाधव (२२) आणि विकास पाठारे (४१) अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत. दगड, विटा, लाकडी बॅट तसेच लोखंडी सळईचा वापर करून रविवारी रात्री नऊच्या सुमारास इंडियाबुल्स कंपनीच्या सुरक्षारक्षक चौकीची तोडफोड करण्यात आली.
अमरावतीमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सच्या प्रकल्पाला शेतीचे पाणी दिले जात असल्याची टीका केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आला.