शेतात कीटकनाशके फवारल्याने विषबाधा होऊन ३२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात बुधवारी राडा घातला. कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोरच कार्यालयात आदळआपट करीत अधिकाऱ्यांच्या टेबलाची काच फोडली. तसेच खुर्च्यांचीही मोडतोड केली.


यवतमाळ येथे कीटकनाशकांमुळे जीव गमवाव्या लागलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणावरुन सध्या राज्यात वातावरण तापलेले आहे. या मृत्यू प्रकरणाला कारणीभूत असलेल्या संबंधित कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर विशेष चौकशी पथकाच्या माध्यमातून (एसआयटी) चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

यवतमाळ जिल्ह्य़ात कापूस आणि सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३२ शेतकरी मृत्युमुखी पडल्यामुळे देशात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे. या प्रकरणाची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने गेल्या आठवडय़ात दिले होते. त्या चौकशीच्या आधारे आता या प्रकरणाची सखोल चौकशी ‘एसआयटी’मार्फत करण्यात येणार असून त्यात दोषी आढळणाऱ्या सर्वावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले. ही रसायने तयार करणाऱ्या कंपन्या तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याबरोबरच जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकनिर्मिती आणि त्यांच्या फवारणीबाबत सुधारित कायदा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली असून हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याची एक महिन्यात माहिती देण्याचे आदेशही आयोगाने केंद्र व राज्य सरकारला दिले आहेत. आयोगाने यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना या संदर्भातील नोटीस बजावली असून बाधित शेतकऱ्यांवर मोफत वैद्यकीय उपचार करावेत, असे निर्देशही दिले आहेत. भविष्यात अशा घटना घडून नयेत, यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, तसेच या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याची माहिती आयोगाने मागविली आहे.