महागडे मोबाइल पळवणाऱ्या झारखंडातील टोळीचा नांदेडच्या सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीतील आठ जणांच्या मुसक्या आवळत सुमारे दोन लाख रुपयांचे १३ मोबाइल पोलिसांनी जप्त केले. यातील सहा आरोपी अल्पवयीन आहेत.
सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौठा परिसरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात काही महागडे मोबाइल चोरीला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार सिडकोचे पोलीस निरीक्षक संपत िशदे यांनी सापळा रचला. बाजारातून दोन मोबाइल चोरी गेल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चार मोबाइल सापडले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी करताच टोळीचा पर्दाफाश झाला.
झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील तालाजरी येथील हे आठ जण िहगोली गेट परिसरात भाडय़ाच्या खोलीत राहात होते. दिवसभरात आठवडी बाजार, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरायचे, हा त्यांचा उद्योग होता. चोरलेले मोबाइलची कोलकाता येथे ते विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. सर्व आरोपी मोबाइल चोरल्यानंतर पश्चिम बंगालच्या सीमेवर विकत असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. आतापर्यंत त्यांनी किती मोबाइल चोरले याची माहिती पोलीस घेत आहेत.