पंतप्रधान होणाऱ्या माणसाने देशातील सर्व जातिधर्माच्या लोकांना विश्वास द्यावा लागतो, अशा विश्वासालाच ज्याने तडा दिला आहे ते मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, मकरंद पाटील, शिवेद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, बाळासाहेब भिलारे, बकाजीराव पाटील, सुधीर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
गुजरातच्या प्रगतीचा ढोल बडवणाऱ्या मोदीबरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जाहीर चर्चा करण्याची माझीही तयारी असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, पंतप्रधान होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यातच मागील काही वर्षांत सर्वात जास्त दंगली झाल्या. त्यांच्या कार्यालयापासून फक्त वीस किमी अंतरावर एका काँगेसच्या खासदाराला काही लोकांसह मारल्यानंतर या मुख्यमंत्र्यांना त्या खासदाराच्या नातेवाइकांना भेटायला सुद्धा जाता आल नाही. तो कोणत्या जातिधर्माचा आहे यापेक्षा तो गुजराती आणि भारतीय आहे आणि एका पक्षाचा खासदार आहे ही बाबही जास्त महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी पंतप्रधानपदाची अपेक्षा बाळगणाऱ्याने सर्व जातिधर्माच्या हिंदुस्थानातील भारतीयांना विश्वास द्यायला हवा. तो मोदी देऊ शकत नाहीत. सामान्य माणसाच्या अधिकारांचा सन्मान, न्याय व प्रतिष्ठाही ते देत नाहीत, असे मोदी पंतप्रधान होण्याच स्वप्न पहात आहेत.
काँग्रेस आघाडी सरकारने मागील दहा वर्षांत शेतकऱ्यांचं जीवन बदलण्याचं काम केलं. शून्य टक्के व्याजदरानं कर्ज दिलं, आयात होणारे अन्नधान्य आज निर्यात होऊ लागलं. देशाला मोठं परकीय चलन मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांना संरक्षणाची हमी दिली. अन्न सुरक्षा कायद्याने महाराष्ट्रातील साठ लाख कुटुंबांना फायदा मिळवून दिला. सहकार साखरी उद्योग, दुष्काळ, जनावरांसाठी छावण्या, शेती उत्पादनाला हमी भाव गारपीटग्रस्तांना मदत केली, अशी सर्व सुखदुखातील कामे आघाडी सरकारने केली. इको सेनसिटिव्ह झोनमुळे सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक व कोकणात मोठा परिणाम होणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाईल. यापुढे सातारा जिल्हय़ातील सर्वाना उदयनराजे भोसलेची साथ मिळेल हे सांगायला मात्र पवार विसरले नाहीत. या वेळी उदयनराजे भोसले यांनी यापुढे सातारा जिल्ह्य़ाच्या जिव्हाळ्याचे केंद्रातील सर्व प्रलंबित प्रश्न शरद पवारांच्या सहकार्याने सोडविणार असल्याचे सांगितले. या वेळी आमदार मकरंद पाटील यांनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मध्ये केलेल्या कामांच्या जोरावर उदयनराजेंना मोठे मताधिक्य देणार असल्याचे सांगितले. भाजी मंडईत झालेल्या सभेला माठी गर्दी जमली होती.