मोदींनी समन्वय ठेवल्यास राष्ट्रपतीची निवड बिनविरोध शक्य

संसदेच्या दोन्ही सभागृहात माझ्या पक्षाचे संख्याबळ जेमतेम १४ इतकेच असताना राष्ट्रपतिपदासाठी स्वत:चा विचार करणे उचित नाही. त्याबाबत स्वप्नदेखील पाहात नाही, याचा पुनरुच्चार करीत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी योग्य समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत व्यक्त केले. देशात भाजपसमोर कोणताही पक्ष सक्षम नसल्याने अजूनही मोदी लाट असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

संसदीय कारकिर्दीला अखंड पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सोलापुरात सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय आयोजित नागरी सत्कार सोहळा आयोजिला होता. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय राजकीय घडामोडींपासून ते थेट स्थानिक पातळीवरील उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रश्नापर्यंत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती.

पवार म्हणाले, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ जास्त आहे. त्यात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे संख्याबळ आणखी वाढले आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांशी योग्यप्रकारे समन्वय साधला, तर राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले.

देशात नोटाबंदीनंतर अजूनही मोदी लाट कायम असून मोदींचा प्रभाव सर्वत्र जाणवतो. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपला विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळत आहे. मात्र ही लाट कायम राहणार नाही. गेल्या तीन वर्षांत देशात मोदी व भाजपसमोर  काँग्रेससह अन्य कोणताही पक्ष सक्षम नाही. त्यामुळेच जनता भाजपला साथ देऊ लागली आहे. ही स्थिती येत्या काही दिवसांनी बदलू शकेल, असे भाकितही पवार यांनी नोंदविले.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पक्ष सावरण्याविषयी उपस्थित प्रश्नावर पवार यांनी, पक्षाला पूर्वपदाला आणण्यासाठी राज्यभर दौरे करणार असल्याचे सांगितले. गटबाजी वाढली असेल तर ती थोपवून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. राज्यात मागील दोन-तीन वर्षांतील दुष्काळामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली असून ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझव्‍‌र्ह बँक व नाबार्ड यांच्यासोबत बैठक घेऊन साखर कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातून बेसुमार पाणी सोडले जात आहे. गरज नसताना वारेमाप पाणी सोडणे योग्य नाही. योग्यप्रकारे नियोजन करूनच पाणी सोडावे लागेल, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भाजप सरकारच्या काळात मंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधिकारी मनमानी कारभार करून वाट्टेल ते करतात. ते थांबणे गरजेचे आहे, असेही मत पवार यांनी मांडले. उजनी धरणात पुणे व पिंपरी-चिंचवड येथून सोडलेले सांडपाणी मिसळते. हेच दूषित पाणी सोलापूरकरांना प्यावे लागते. उजनी धरण हे पुणे व पिंपरी-चिंचवडचे जणू सुवेझ कालवा बनले आहे. त्याबाबत लक्ष वेधले असता पवार यांनी, पुणे महापालिकेला मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले, मात्र त्यासाठी ४५० कोटी रुपये निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनी धरणात येणारे सांडपाणी थांबविता येईल, असे त्यांनी नमूद केले.