पाथरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार मोहन फड यांनी कार्यकर्त्यांसह आज गुरुवारी पुणे येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत सोनपेठ पालिकेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचे पुत्र कल्पेश राठोड यांनीही भाजपात प्रवेश केला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार फड हे अपक्ष निवडून आले होते. सुरुवातीला सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणारे पत्र फड यांनी राज्यपालांना दिले होते. २०१६ अखेर ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही शिवसेनेत परतले. सहा महिने शिवसेनेत ते राहिले. मानवत पंचायत समिती सभापती निवडीवरून खासदार संजय जाधव यांच्याशी त्यांचा बेबनाव झाला व त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पुन्हा फड यांनी भाजपमध्ये परतण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते.

बुधवारपासून िपपरी-चिंचवड येथे भाजप राज्य कार्यकारिणीची बठक सुरू आहे. आज बठकीच्या समारोपापूर्वी आमदार मोहन फड यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अ‍ॅड. विजय गव्हाणे आदी उपस्थित होते. फड यांच्यासमवेत मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, यश कत्रूवार, बालाजी कुऱ्हाडे, गणेश कुमावत, गंगाधरराव कदम, दीपक मगर, सर्जेराव गिराम, नंदकुमार स्वामी, कल्पेश चंद्रकांत राठोडसह सोनपेठ, पाथरी, सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

सेलूची जनशक्ती विकास आघाडी भाजपात विलीन होणार?

सेलू नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती विकास आघाडीने लढविली होती. या आघाडीला बहुमत मिळाल्याने नगराध्यक्ष विनोद बोराडेसह आघाडीचे सर्व नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र,काही अपरिहार्य अडचणीमुळे आघाडी भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. जनशक्ती विकास आघाडी लवकरच भाजपात विलीन होणार अशी माहिती उपनगराध्यक्ष प्रभाकर भाऊसाहेब सुरवसे यांनी दिली.