१००, ५० च्या नोटा स्वीकारूनही रोखपालाकडून रद्द केलेल्या नोटांचे संगणकावर विवरण

नोटा बंदीच्या निर्णयानंतर महावितरण कंपनीने देयक भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध केली. या काळात काही ग्राहकांनी १०० व ५० च्या नोटांच्या स्वरुपात वीज देयकांचा भरणा केला. त्यावेळी नोटांचे विवरण संगणकात भरताना रोखपालाने रद्दबातल नोटा स्वीकारल्याचे दर्शविले. रोखपालाची ही कृती म्हणजे काळ्याचे पांढरे करण्याचा प्रकार असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. नाशिकसह राज्यात इतरही भागात असेच प्रकार घडल्याची शक्यता आहे.

५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल झाल्यानंतर त्या बदलविणे अथवा खात्यात भरणे यासाठी बँकांमध्ये मोठमोठय़ा रांगा लागल्या. याच काळात शासन अखत्यारीतील महावितरण, स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी देयक व कराचा भरणा जुन्या नोटांनी करण्याची व्यवस्था करण्यात आली. चलन तुटवडय़ामुळे सर्वसामान्य त्रस्तावले असताना या माध्यमातून वीज कंपनी आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी आमदनी प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले.

या घडामोडीत काही अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारी होत आहे. या काळात बहुतांश ग्राहकांनी आपल्याकडील जुन्या नोटांच्या मदतीने वीज देयक अथवा करांचा भरणा केला. मात्र, त्यात काही असेही ग्राहक होते की, ज्यांच्याकडे ५० व १०० रुपयांच्या नोटा होत्या. संबंधितांनी चलनात वापरात असलेल्या नोटा देयक भरण्यासाठी दिल्या, परंतु, त्यांच्याकडूनही रद्दबातल चलन स्वीकारल्याच्या नोंदी वीज कर्मचाऱ्यांकडून झाल्याचा संशय आहे.

५०० व हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी १०० व ५० च्या नोटांच्या आधारे आपली देयके भरली असतील. संबंधितांकडून चलनातील सुटय़ा नोटा घेऊन त्या जुन्या नोटा असल्याचे दर्शवत काळ्याचे पांढरे करण्याचा हा प्रकार असल्याची शंका ग्राहक व्यक्त करत आहेत.

इतर कर्मचाऱ्यांचाही हात?

शहरातील एका ग्राहकाला तसाच अनुभव आहे. १४०० रुपयांचे वीज देयक भरण्यासाठी ते शरणपूर रस्त्यावरील वीज कंपनीच्या केंद्रात गेले. १०० रुपयांच्या १४ नोटा आपण देयकासोबत रोखपालाकडे दिल्या. संगणकावर नोटांचे विवरण भरताना रोखपालाने एक हजाराची एक आणि १०० रुपयांच्या चार नोटा प्राप्त झाल्याचे नमूद केले. ही बाब लक्षात आल्यावर ग्राहकाने रोखपालाकडे विचारणा केली असता संबंधिताने वाद घालण्यास सुरूवात केली. देयक भरण्यासाठी मोठी रांग आहे. जलदपणे काम व्हावे यासाठी तसा उल्लेख केल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित रोखपालास केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनी साथ दिल्याची तक्रार ग्राहकाने केली.

देयक भरणा करताना १०० व ५० नोटा देणाऱ्या वीज ग्राहकांना वीज कंपनीच्या केंद्रात जुन्या नोटा स्वीकारल्याचे दर्शविल्याचा अनुभव आला असल्यास त्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार करावी. संबंधित वीज भरणा केंद्रावर संगणकात या पध्दतीने नोंद का करण्यात आली, याची सखोल चौकशी केली जाईल. त्यात कोणी दोषी आढळल्यास कारवाईही केली जाईल. एम. जी. शिंदे शहर अभियंता, महावितरण