नगर जिल्ह्यत परिस्थिती गंभीर; सिंचनावर ताण, पोलीस बंदोबस्ताची वेळ

धरणे भरली असली तरी लाभक्षेत्रातून पाऊस गायब झाला. खरिपाची उभी पिके वाचविण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. पण शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची मागणी झाल्याने सिंचन व्यवस्थेवर ताण पडला आहे. एकाच वेळी सर्वाना पाणी देण्याची कालव्यांची क्षमताच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत असून, पोलीस बंदोबस्त घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या झाल्या. जुलनंतर पावसाने पाठ फिरविली. आता निम्मा ऑगस्ट सरत आला तरी पावसाने ओढ दिल्याने पिके वाचविण्यासाठी धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले आहे. कुकडी, घोड (जि. पुणे), गंगापूर व दारणा (जि. नाशिक), भंडारदरा, निळवंडे व मुळा (जि. नगर) या धरणांमधून सोडण्यात आलेल्या आवर्तनात सुमारे १७ ते १८ टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. भर पावसाळ्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी वापरण्याची ही अनेक वर्षांतील पहिलीच वेळ आहे. पण, कालव्यांची वहनक्षमता कमी आणि मागणी जास्त तसेच एकाच वेळी पाणी देण्याचा आग्रह धरला जात असल्याने अधिकारी गोंधळून गेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता जलसंपदाला सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करून कालव्यांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. धरणांचे आवर्तने एक महिना चालणार असले तरी कालव्याखालील काही क्षेत्रातील पिके जळून जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील कुकडी व घोड या दोन्ही धरणांमध्ये यंदा चांगला पाणीसाठा आहे. कुकडीचे पाणी कर्जत, श्रीगोंदा व पारनेर तर घोडचे पाणी कर्जत व श्रीगोंद्याच्या शेतीला मिळते. धरणांपासून २५० किलोमीटर लांबी कालव्याची आहे. दोन्ही धरणांतून १८ जुलपासून पाणी सोडण्यात आले. पावसाच्या पाण्यावर खरीप पिकांची लागवड एकाच वेळी करण्यात आली. सहाजिकच शेतकरी पाण्याची मागणीही एकाचवेळी करतात. नगर जिल्ह्यात कुकडी कालव्याची लांबी १५० किलोमीटर असून, सुमारे १०० चाऱ्या आहेत. तर घोडची लांबी ८४ किलोमीटर असून ५० चाऱ्या आहेत. कुकडी कालव्यातून एक हजार क्युसेक्सने पाणी सोडले जाते. त्यामुळे सर्व चाऱ्या एकाच वेळी सोडता येत नाहीत. आवर्तन ५५ दिवस चालते. काही भागाला उशिरा पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिके जगणार नाहीत. साहजिकच शेतकऱ्यांचा रोष असल्याने आवर्तन काळात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.

जी परिस्थिती कुकडीची तीच मुळा धरणाची आहे. मुळा धरणातून शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहुरी या तालुक्यांतील २५ हजार हेक्टर क्षेत्राकरिता पाण्याची मागणी आली आहे. दहा दिवसांपूर्वी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. उजवा कालवा एक हजार ६०० क्युसेक्स तर डावा कालवा ३०० क्युसेक्सने सोडण्यात आला. एकाच वेळी पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली. शेतकरी मधेच पाणी वळवितात. तुरुंगात टाका, पण जळून जाणाऱ्या पिकांना पाणी द्या, अशी भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणे मुश्कील होऊन बसल्याने जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज केला आहे. मुळाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनीही त्यास दुजोरा दिला.

भंडारदरा व निळवंडे धरणातून राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे या तालुक्यांतील क्षेत्राला पाणीपुरवठा होतो. दोन दिवसांपूर्वी शेतीसाठी आवर्तन सोडले. आठ दिवस नेवासे तालुक्यातील भरणे होईल. पण त्यास एक महिन्याचा कालावधी लागेल. तोपर्यंत काही भागातील पिके जळून जातील. हीच परिस्थिती कोपरगाव तालुक्यातील आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा हे दोन्ही धरणे भरली. आता शेतीसाठी पाणी सोडले आहे. उजव्या कालव्याखाली पाच हजार हेक्टर तर डाव्या कालव्याखाली तीन हजार हेक्टर क्षेत्र आहे. गोदावरी नदीतून मराठवाडय़ाला ३७ टीएमसी पाणी गेले. त्यामुळे किमान शेतीचे आवर्तन करण्याला अडचणी आल्या नाही. डावा कालवा हा ७५ किलोमिटर तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे. दोन्ही कालव्याखाली १०० लहान, मोठय़ा चाऱ्या असून १५० गावांतील क्षेत्राला पाणी पुरविले जाते. ८०० क्युसेक्स कालव्याची पाणी वहनक्षमता आहे. सर्व क्षेत्राला एकाच वेळेस पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे आवर्तन सुरू असूनही काही क्षेत्र तसेच राहील. एका शेतकऱ्याला पाणी मिळते अन् दुसऱ्याला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रोष वाढतो. एकूणच जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

कालवे रुंदीकरणाचा प्रस्ताव

मुळा कालव्याच्या रुंदीकरणाचा व चाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भविष्यात नियोजनात सुधारणा करता येईल. एकाच वेळी सर्वाना पाणी देणे शक्य होत नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणी आल्या तरी मार्ग काढण्याचे काम सुरु आहे. सर्वात आधी मुळातून आवर्तन सोडले. असे प्रसंग उद्भवू नये म्हणून दीर्घकालीन धोरण आखले जात आहे.

बाळासाहेब मुरकुटे,

आमदार, नेवासे नियोजनच चुकीचे

मुळा धरणाच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे चुकल्याने आज पावसाळ्यात पिके जळण्याचे संकट आले. धरणाच्या इतिहासात आवर्तनाला पोलीस संरक्षण घ्यावे लागते हे दुर्दैव आहे. आपण आमदार असताना असे प्रसंग कधी आले नाहीत. आहे त्या व्यवस्थेत नियोजन केले. जलसंपदाकडे अधिकारी व कर्मचारी नाही. आवर्तन शेतकऱ्यांच्या हातात देऊन अधिकारी निघून जातात. त्याने गोंधळ उडतो.

शंकर गडाख, माजी आमदार, नेवासे

एकाच वेळी पाणी देण्याची व्यवस्था नाही

कुकडी कालव्याची वहनक्षमता एक हजार क्युसेक्स एवढी आहे. एकाच वेळी पाणी देता येत नाही. त्यासाठी वहनक्षमता १६०० क्युसेक्स एवढी करावी लागेल. पाऊस नसल्याने प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांची पाणी मागणी रास्त आहे. पाणी उशिरा मिळाल्याने पिके सुकतात. त्यांचा रोष वाढतो. वेळेवर नियोजन करूनही परिस्थितीमुळे प्रश्न निर्माण झाले. आवर्तनाला पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला.

सुभाष कोळी, कार्यकारी अभियंता, कुकडी कालवे विभाग

मंत्रालयातून नियोजन सुरू झाल्याने गोंधळ

पूर्वी गोदावरी कालवा सल्लागार समितीची बठक कोपरगाव किंवा राहता येथे होत असे. पण, आता ती मंत्रालयात होते. लोकप्रतिनिधी व साखर कारखानदारांना त्यावर घेण्यात आले. तेच निर्णय घेतात. कालव्याचे पाणी पुढाऱ्यांनाच मिळते. त्यांचे शेततळे भरुन घेतले जाते. गरिबांना पाणी मिळत नाही. मग शेतकऱ्यांचा रोष वाढणार नाही तर काय?

राजेंद्र खिलारी, पाणीप्रश्नाचे अभ्यासक, कोपरगाव