सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भावे, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, मराठवाडय़ातील विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्यासह राज्यातील १२ थोर व्यक्तींच्या स्मारकांचे काम विद्यमान सरकारच्या कारकीर्दीत रखडले असून, आता येत्या बुधवारी या सर्व अपूर्ण कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

वरील तीन थोर व्यक्तींशिवाय बालगंधर्व, जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवाडी (सांगली), बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत (सिंधुदुर्ग), बाळासाहेब सावंत (रत्नागिरी), सी. डी. देशमुख (रायगड), संताजी घोरपडे (कोल्हापूर), मारोतराव कन्नमवार (चंद्रपूर) आदी राजकारण, सहकार व कला क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या स्मारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाने निधी मंजूर केला, पण यातील सी. डी. देशमुख, कन्नमवार आणि कुरुंदकर या तिघांच्याच स्मारकांचा संपूर्ण मंजूर निधी आजवर वितरित झाल्याची माहिती वरील विभागाच्या एका पत्रातून समोर आली.

यातील बहुतांश स्मारकांची कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू असून, येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची सांगता होणार आहे; पण त्यांच्या सांगलीतील नियोजित स्मारकासाठी ८ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता असतानाही अद्याप ३ कोटी रुपये देय आहेत.

राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत आणि विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर शहराजवळील बल्लारपूरला करण्याचा निर्णय झाला होता. मंजूर निधीतून या स्मारकाचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले; पण सामान्य प्रशासन विभागाकडे तशी नोंद दिसत नाही. आचार्य विनोबांच्या रायगड जिल्ह्णाातील जन्मगावी होणाऱ्या स्मारकासाठी ७४ लाख ७० हजारांची मंजुरी होती. त्यापकी केवळ १० लाख रुपये वितरित झाले. माजी मंत्री भाई सावंत यांच्या सिंधुदुर्गातील स्मारकासाठी ९५ लाख मंजूर झाले होते, पण या स्मारकाच्या कामाचा निधी अद्यापही वितरित झालेला नाही! मराठवाडय़ातील साहित्यिक वर्तुळासाठी नरहर कुरुंदकर यांचे नांदेडमधील स्मारक हा मोठा आस्था विषय.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या स्मारकाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना २००९-१०च्या अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. गेल्या ७ वर्षांत मंजूर निधी वितरित झाला; पण त्यातून स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील कामही पूर्ण होऊ शकले नाही. विद्यमान सरकारने वाढीव कामासाठी लागणारा निधी देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला असून, मनपा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस सरकारच्या या कुर्मगतीच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य करण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.

४ ऑक्टोबरच्या बठकीत आढावा

राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य थोर व्यक्तींच्या स्मारकांची सद्य:स्थिती, झालेला खर्च तसेच वितरित करावयाचा निधी, जी कामे सुरू झाली नाहीत त्याची कारणे याबाबतचा र्सवकष आढावा ४ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बठकीत घेतला जाणार असून, त्या त्या जिल्ह्णाातील संबंधित अधिकाऱ्यास बठकीस हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.