गोवा राज्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. हा विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या हद्दीजवळच असल्याने या भागाचा पर्यटन विकासाला आणखी जोमाने चालना मिळेल, असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला.
भाजपच्या वतीने बांदा लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ना. पार्सेकर बोलत होते. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, शीतल राऊळ, मंदार कल्याणकर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील बांदा गावापासूनच जवळच असणाऱ्या मोपा विमानतळाची बांधणी येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे गोवा राज्यासोबतच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्य़ाला त्याचा निश्चितच फायदा होईल. हा विमानतळ डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण होईल, असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
या वेळी शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांनी चार कोटी रुपयांचे क्रीडा संकुल बांदा गावात मंजूर होणार आहे. शासकीय जमिनीत होणाऱ्या क्रीडा संकुलाच्या उभारणीनंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जेव्हा निर्माण होतील तेव्हाच क्रीडांगणाचा उद्देश सफल होईल, असे त्यांनी सांगून पर्यटन जिल्ह्य़ात संघाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे वचन ना. तावडे यांनी दिले.
या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गचा पर्यटन विकास साधताना बांद्याचा निश्चितच विचार होईल. आजचा भाजपचा लोकोत्सव आहे.
आता पुढील काळात बांदा ग्रामपंचायतीने पर्यटन महोत्सव घ्यावा, त्याला जिल्हा नियोजन मंडळातून  निश्चितच आर्थिक सहकार्य करू, असे ना. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच शीतल राऊळ, सरपंच सौ. नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी विचार मांडले. दोन दिवसांचा लोकोस्तव आयोजित केला होता.