पावसाची प्रदीर्घ ओढ, ऐन पावसाळय़ातील पाणीटंचाई अन् पावसाअभावी वाया जात असलेला खरीप हंगाम असे विदारक स्थिती उभी ठाकली असताना, बुधवारी दुपारी साडेबारानंतर कोसळलेल्या धो धो पावसाने बळिराजासह सामान्य जनतेला दिलासा दिला. धुवाधार पावसाने कराड परिसराची पुरती दैना उडवून दिली. सर्वत्र पाणीच पाणी होताना, सखल भागात पाणी शिरून दुकाने व रहिवाशी मिळकतींचे नुकसान झाले. या पावसाने महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावल्याने हजारो प्रवाशांचे व वाहनधारकांचे हाल झाले.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख ११ धरणांमध्ये १९१.३१ टीएमसी एवढा जलसाठा असून, त्याची ७३.७३ इतकी टक्केवारी आहे. त्यात राधानगरी प्रकल्पात सर्वाधिक ९६ टक्के तर, धोम धरणात सर्वात कमी ४८.८३ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित धरणांमधील जलसाठा टीएमसीमध्ये, कंसात त्याची टक्केवारी – कोयना ७९.७१ (७५.७४), चांदोली ३२.३९(९४), कण्हेर ८.११(८०.३१), दुधगंगा १९.२६(७६), धोम-बलकवडी ३.३१(७८.१५), उरमोडी ८.९५ (८९.४६) तर सातारा जिल्ह्य़ाच्या हद्दीवरील तसेच पुणे जिल्ह्य़ातील भाटघर १५.५० (६५.९७), वीर १.९१(४२.१९), नीरा देवघर ७.५५(६४.४२). सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणात -४.९७ टीएमसी म्हणजेच उणे ९.२८ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. कोयना धरणाच्या पाणलोटात सरासरी २,८०९.३३ मि.मी. म्हणजेच ५६.१९ टक्के पाऊस कोसळला आहे.
सर्वत्र दुष्काळस्थिती गडद झाली असताना, पश्चिम महाराष्ट्रातील जलसाठय़ांची टक्केवारी मात्र उत्तम असल्याचे दिसून येत आहे. जलसाठय़ांची टक्केवारी आणि पावसाअभावी जळत असलेली पिके पाहता धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र, धरणांच्या क्षेत्रातील हा पाऊस तुलनेत कमीच झाला आहे. गतवर्षी अपवाद वगळता सर्वच धरणांमधून पाणी सोडण्यात आले होते. यंदा राधानगरी व चांदोली जलाशय वगळता अन्य प्रकल्प क्षमतेने भरण्याची चिन्हे आज मितीला तरी धूसर वाटत आहेत. ऐन पावसाळय़ात सध्या कोयना, चांदोली, कण्हेर व धोम धरणांतून लोकांच्या मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगली पाटबंधारे विभागाने सांगितले.
बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने ओढे वाहू लागले तर, नद्यांच्या पाणी पातळीतही काहीशी वाढ झाली. जोराच्या पावसाने समाधानाची लहर निर्माण केली. पावसाळय़ाचा काही कालावधी शिल्लक असल्याने वरुण राजाची निश्चितच कृपादृष्टी राहील अशी आशादायी चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.