वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणारा कुट्टू याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आहे. २२ तारखेला भंडाऱ्यातील कारागृहातून दोन पोलीस निरीक्षक कुट्टूला एसटीने वडसा येथे घेऊन निघाले होते. दरम्यानच्या प्रवासात दिघोरी येथे कुट्टूने पोलिसांकडे लघुशंकेला जाण्यासाठी परवानगी मागितली. पोलिसांनी त्याला परवानगी दिल्यानंतर कुट्टूने वेळ साधली आणि तेथून पळ काढला. कुट्टूने यापूर्वी पोलिसांना दिलेल्या जबानीत आत्तापर्यंत ५० वाघ मारल्याचे कबुल केले होते. याशिवाय, आत्तापर्यंत वाघांच्या कातडीचे कोट्यवधींचे व्यवहार केल्याचेही त्याने मान्य केले होते. कुट्टू हा भंडारा, वडसा, ब्रह्मपुरी आणि ताडोबाच्या परिसरातील वाघांची शिकार करून त्यांच्या कातड्याची तस्करी करत असे. काही दिवसांपूर्वीच शिकार विरोधी पथकाच्या विशाल माळी यांनी कुट्टूला कटणी येथून अटक केली होती.