हिंसक बनलेल्या बिबटय़ाने आईच्या कुशीतील तान्हुल्याला वारंवार हिसकावण्याचा प्रयत्न केला… तरीही बाळाला सोडत नाही म्हणून आईच्या पायाचा लचका तोडला.. मात्र पोटच्या गोळ्यासाठी दुर्गेचा अवतार धारण केलेल्या त्या मातेने सर्वशक्तिनिशी इतरांच्या मदतीने बिबटय़ाविरोधातील लढाई जिंकली.. आईची माया काय असते हे जणू आपल्या कृतीतून तिने बिबटय़ाला दाखवून दिले.
संगमनेर-अकोले या वर्दळीच्या रस्त्यावरील कोकणेवाडी येथे काल, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बिबटय़ाच्या हल्ल्याचे थरारनाटय़ रंगले. धांदरफळ खुर्द येथील भाऊसाहेब खताळ, आपली पत्नी रूपाली आणि एक वर्षाचा मुलगा कृष्णा, यांच्यासह दुचाकीवरून अकोल्याहून आपल्या गावी परतत होते. याच गावातील एका चिमुरडीला मागच्या आठवडय़ात बिबटय़ाने आपले भक्ष्य केले होते. कोकणेवाडी शिवारातील भैरवनाथ मंदिरासमोर त्यांची दुचाकी आली असता, लगतच्या झाडीत दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने दुचाकीवरील तिघेही खाली पडले. अशाही स्थितीत रूपालीने खाली पडलेल्या कृष्णाला छातीशी कवटाळले. काय झाले हे कळायच्या आत बिबटय़ाने पुन्हा एकदा हल्ला चढविला. भेदरलेले दाम्पत्य कसेबसे बिबटय़ाचा प्रतिकार करू लागले. अशातच बिबटय़ाचे लक्ष रूपाली यांच्या हातातील छोटय़ा कृष्णावर गेले.
बिबटय़ाने धडकी भरवणारी जोराची डरकाळी फोडत कृष्णाला पकडण्यासाठी मातेवर हल्ला चढविला. रूपालीने धूर्तपणा दाखवत कृष्णाला पदराआड लपवून ठेवले. अशाही स्थितीत बिबटय़ा वारंवार कृष्णाला हिसकावण्यासाठी प्रयत्न करत होता. दुचाकीवरून पडल्याने काहीसे बेशुद्ध झालेले भाऊसाहेब खताळ हेही आता मदतीला धावले, मात्र बिबटय़ा कृष्णाला हिसकावण्याचा जोराजोरात प्रयत्न करता होता. भक्ष्याच्या आड येणाऱ्या रूपालीच्या पायाचा बिबटय़ाने लचका तोडला. तरीही त्या मातेने बाळावरील आपली पकड तसूभरही ढिली होऊ दिली नाही. अवघ्या काही मिनिटांचा हा थरार आता अगदी हातघाईवर आला होता. खताळ दाम्पत्याचा प्रतिकार कमजोर ठरू पाहात होता.
तेवढय़ात त्याच मार्गाने जात असलेल्या एका कारचालकाने अगदी निर्णायक क्षणी त्यांची मदत केली. कारचे प्रखर दिवे आणि मोठय़ा आवाजाने बिबटय़ा थोडा बिचकला. हीच संधी साधत मनातून भेदरलेल्या कारचालकाने तेथील लाकडी दांडके उचलत बिबटय़ाला घाबरवले. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेत बिबटय़ाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. मोठमोठय़ा जखमांची तमा न बाळगता आपले बाळ वाचल्याचे आनंदाश्रू त्या मातेच्या नेत्रांतून ओघळले.