काही महिलांच्या स्तनातील दुधात जी शर्करा असते. त्यामुळे त्यांच्या बाळांचे संभाव्य जीवाणू संसर्गापासून संरक्षण होते, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. बी.स्ट्रेप्टोकॉकस हा मेंदूज्वरास कारण ठरणारा जीवाणू हे जागतिक पातळीवर पहिल्या तीन महिन्यांत बाळाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमुख कारण आहे. हा जीवाणू दर तीनपैकी एका महिलेच्या पोटात किंवा योनीमार्गात असतो व तो स्तनपानातून मुलांकडे जाऊ शकतो.

इंपिरियल कॉलेज लंडनच्या संशोधनानुसार गांबियात १८३ महिलांची तपासणी केली असता त्यांच्या स्तनातील दुधात अशा प्रकारची साखर होती, ज्यामुळे बी.स्ट्रेप्टोकॉकस जीवाणू मारले जात होते. प्रत्येक महिलेचे दूध विविध शर्करांचे मिश्रण असते. त्याला ह्य़ूमन मिल्क ऑलिगोसॅखराइडस असे म्हणतात. या शर्करा बाळाच्या पोटात पचत नाहीत, पण त्या पोटाचे रक्षण करण्यात मात्र मदत करतात.

लुईन अँटीजने सिस्टीम ही स्तनातील दुधात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सर्व मातांचे दूध तपासले असता त्यातील शर्करा ही लुईस जनुकांनी नियंत्रित होते असे दिसून आले. महिला व त्यांची बाळे यांच्यातील बी.स्ट्रेप्टोकॉकस तपासले असता मुलाच्या जन्मानंतर ६० ते ८९ दिवसांनी महिलांच्या दुधात कमी जीवाणू दिसून आले व बाळांमध्येही ते कमी दिसून आले.

ज्या मातांच्या दुधात लॅक्टो एन डायफुकोहेक्झोस ही शर्करा असते त्यांच्या मुलांच्या पोटात जन्मानंतर जीवाणू आढळत नाहीत. त्यामुळे ही साखर बाळांना सुरक्षित करते. ही साखर स्ट्रेप्टोकॉकस जीवाणूंना मारते. ‘जर्नल क्लिनिकल अँड ट्रान्सलेशनल इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)