वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील शेतकरी लक्ष्मण बापू ठाकरे (५६) यांनी स्वतच्याच पोल्ट्री शेडमध्ये रविवारी गळफास लावून आत्महत्या केली.
नापिकीमुळे कर्ज भरू शकले नसल्याने बॅंकेची आलेली नोटीस तसेच पोल्ट्री शेडचे वीज बिल न भरल्याने खंडित केलेला वीजपुरवठा यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर सुमारे सहा लाख रुपयांचे कर्ज होते.
दोन वर्षांपासून नापिकीमुळे कर्ज भरू न शकलेले ठाकरे यांना सेवा सहकारी सोसायटीने थकीत कर्जाबाबत नोटीस पाठवली. तसेच पोल्ट्री शेडचे ५५ हजार रुपये थकीत वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने विद्युतपुरवठाही खंडित केला. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायही बंद पडला. रविवारी सकाळीच पोल्ट्री व्यवसायासाठी कंपनीकडून दोन हजार पक्षी (कोंबडीची पिल्ले) आले होते, परंतु विद्युतपुरवठा खंडित केल्याने ते पक्षी ठेवू शकले नाहीत. याचा अधिक मनस्ताप झाल्याने ठाकरे यांनी पोल्ट्रीच्या शेडमध्येच गळफास लावून आपले जीवन संपविले.