राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्याच्या साकूर (ता. संगमनेर) येथील खासगी साखर कारखान्याला पिंपळगाव खांड धरणाचे पाणी देण्याचा डाव असल्याचा सनसनाटी आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून तालुक्याचे राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारी अशोक भांगरे व कैलास शेळके यांनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. मंगळवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या संदर्भात छेडले असता अशोक भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे आदी कार्यकर्त्यांनी मंत्री पिचड यांच्या आरोपांचा ठाम शब्दांत इन्कार केला. धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोतूळचा मुळा नदीवरील पूल बुडणार हे माहिती होते. त्यामुळे धरणाच्या भिंतीबरोबरच पुलाचे काम सुरू करणे आवश्यक होते. धरणाच्या िभतींसाठी आग्रह धरणाऱ्यांनी पुलाचे काम का सुरू केले नाही, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला.
पिंपळगाव खांड तलावातून फक्त शंभर क्युसेक पाणी मोरीतून सोडणे शक्य आहे. त्यामुळे दीड महिना पाणी सोडले तरी धरण रिकामे होणार नाही. त्यातच मुळा नदीतून वाहणारे पाणी लक्षात घेता धरणाची पाणीपातळी कमी करणे शक्य नाही, हे आम्हाला समजत नाही काय असा प्रश्न या वेळी करण्यात आला. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचा संगमनेर तालुक्यातील साकुर येथे खासगी साखर कारखाना उभा राहात आहे. पिंपळगाव खांड धरणाचे पाणी या कारखान्याला देण्याचा कुटील डाव असून त्यासाठी सर्व धडपड सुरू असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.