पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला तीन वर्षे पूर्ण होत असताना सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा हिशेब मागत या आश्वासनांची प्रतीकात्मक होळी करून बोंब ठोकली. या वेळी मोदी सरकार हिसाब दो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले.  सोलापुरात तयार होणारे कापड भारतीय लष्करी सैनिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते त्याचे काय झाले, अशी विचारणा आंदोलक युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. नोटाबंदीमध्ये किती काळा पैसा आला? रोजगार, हमीभाव व महागाईचे काय करणार? जीवनावश्यक वस्तूंची महागाई कधी रोखणार? पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसचे दर कधी स्वस्त होणार?

दरवर्षी अडीच कोटी तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?आदी आश्वासनांच्या पूर्ततेबाबत जाब विचारला गेला.  आंदोलनात पंडित सातपुते, सुभाष वाघमारे, राहुल गोयल, गोविंद कांबळे, गणेश साळुंखे, श्रीनिवास परकीपंडला, राहुल बोळकोटे, हेमा चिंचोळकर, अंजन जंगम, वीणा देवकते, अनुपम शहा, युवराज जाधव, अतुल चव्हाण, सुमन जाधव, जयंत रच्छा, मल्लिनाथ सलगर, श्रीकांत गायकवाड, प्रवीण जाधव, राजा शेख, विश्वनाथ दुर्लेकर, संतोष अट्टेलूर आदींचा सहभाग होता.