सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाशी बुधवारी आघाडी केली. विनय कोरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आघाडीची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, या आघाडीनंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी नाराजीचे सूर आळवले आहेत. महायुती ही केवळ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी होती. भाजपने आता जनसुराज्य सोबत आघाडी केली असली, तरी त्यांच्यासोबत जाणे आमच्यावर बंधनकारक नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.

भाजपने जनसुराज्य पक्षाशी आघाडी केल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, भाजपसोबतची महायुती ही केवळ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची भूमिका स्वतंत्र आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षाने भाजपशी आघाडी केल्याने आम्हाला काहीच अडचण नाही. त्या दोन पक्षांमध्ये आघाडी झाल्यामुळे आता आम्हीही त्यांच्यासोबत गेले पाहिजे, असे आमच्यावर कोणतेही बंधन नाही. ही आघाडी केवळ त्या दोन पक्षांमध्ये आहे. आमच्यावर त्याचे कोणतेही बंधन नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची आम्हाला मुभा आहे, असे सांगत राजू शेट्टी यांनी येऊ घातलेल्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे स्पष्ट केले.

खासदार संभाजीराजे, शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे या मातबरांनंतर भाजपच्या संपर्कात जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे आले आहेत. महायुतीत एकूण पाच पक्ष असून, या निमित्ताने आणखी एक नवा मित्र भाजपाशी जोडला गेला आहे. यामुळे भाजप व जनसुराज्यशक्ती या दोन्ही पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची आणखी संधी मिळणार आहे.

दरम्यान, भाजपमध्ये राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका व इचलकरंजी नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अ‍ॅड. अलका स्वामी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पी.जी.शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब शेंडूरे, जे. जे. मगदूम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सोनाली विजय मगदूम, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष यशवंत शेळके, कुरुंदवाड मनसेचे शहराध्यक्ष अवधूत बिरंजे यांच्यासह अन्य डझनभर प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.

भाजप योग्य व्यक्तींचा योग्यवेळी योग्य ते पद देऊन सन्मान करीत असतो. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यापैकी काहींना शासकीय पद देण्यात येईल. नव्यांचे स्वागत करताना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय दिला जाईल. या पक्ष प्रवेशामुळे भाजप मजबूत झाला असून मित्रपक्षांसमवेत आपला झेंडा फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.