गटबाजी थोपविण्यासाठी जबाबदारी सोपविल्याचा खासदार बनसोडे यांचा दावा 

सोलापुरात सत्ताधारी भाजपमधील दोन्ही मंत्री देशमुखांतील पराकोटीला गेलेली गटबाजी व त्यातून पक्षाची पार खालावत चाललेली प्रतिमा थोपविण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत धोक्याची घंटा वाजविली आहे. पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचा दावा खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी केला आहे. प्रदेश पक्षश्रेष्ठींचा निरीक्षक असताना त्याऐवजी खासदार बनसोडे यांच्यावर ही जबाबदारी दिली कशी, अशी प्रश्नार्थक चर्चाही होत आहे.

देशात व राज्यात भाजपची सत्ता असताना सोलापूर शहराचा आश्वासक विकास होण्याच्यादृष्टीने सोलापूरकरांनी महापालिकेत सत्तापरिवर्तन करीत भाजपच्या हाती पहिल्यांदाच सत्ता सोपविली होती. परंतु गेल्या सहा महिन्यात शहराचा विकास होणे दूरच राहिले, पक्षांतर्गत कमालीची गटबाजीचेच पदोपदी दर्शन घडत आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात पक्ष विभागला गेला असून दोन्ही गटांकडून शह-काटशहाचे राजकारण खेळले जात आहे. त्यातूनच वाढलेल्या संघर्षांतून पालिका सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांचा अवमान होणे व त्याबद्दल महापौरांनी स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांचे सहा महिन्यांसाठी निंलबन करणे या घडामोडीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. हे कमी म्हणून की काय, त्यानंतर लगेचच शहर भाजयुमो अध्यक्ष निवडीवरून झालेल्या पक्षांतर्गत वादातून पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांचा पुतळा दहन करण्यापर्यंत मजल गेली. यासंदर्भात ‘लोकसत्ता’सह अन्य प्रसार माध्यमांनी प्रसिध्द केलेल्या वृत्तविश्लेषणाच्या पाश्र्वभूमीवर काल शुक्रवारी सायंकाळी सोलापूरचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे हे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून सोलापूर महापालिकेत दाखल झाले. त्यांनी एका पत्रकार परिषदेत, सोलापुरातील भाजपअंतर्गत गटबाजीची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असून त्यासाठी धोक्याची घंटा वाजविल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेच्यावेळी खासदार बनसोडे यांच्यासमवेत पक्षाचे कोणीही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे खासदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाजविलेल्या धोक्याच्या घंटेचा आवाज दोन्ही मंत्री देशमुखांपर्यतच काय, पण पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कानावर तरी पोहोचणार काय, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.  पक्षातील वाढलेला वाद मिटविण्यासाठी आपणांस मुख्यमंत्र्यांनी पाठविल्याचा दावा खासदार बनसोडे हे करीत असले तरी त्यांनी यासंदर्भात थेट प्रसार माध्यमांशी बोलण्यापूर्वी गटबाजीला थारा देणारे दोन्ही मंत्री देशमुखांसह पालिका पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला नाही. लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर आहे. शहरात पक्षात प्रचंड प्रमाणात बेदिली माजल्याने त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळेच खासदार बनसोडे हे जागे झाल्याचे मानले जात आहे.