सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली शेतक-यांना देशोधडीला लावून हजारो कोटी रुपयांची माया संपादन करण्या-यांवर बडगा उगारा अन्यथा सरकार नेभळट आहे असे खेदाने म्हणावे लागेल अशी संतप्त प्रक्रिया व्यक्त करत दुटप्पी वक्तव्यामुळे सरकारची विश्वासार्हता शिल्लक राहिलेली नाही, टगे मोकाट राहात आहेत. बोलघेवडेपणा सोडून धडक कारवाईची आम्हाला आणि जनतेला अपेक्षा आहे. पुढील आठवडय़ात आपण कृष्णा खोऱ्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचेही सूतोवाच खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
खासदार भोसले पुढे म्हणाले, जलसंपदा खात्यातील हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुध्दा त्याची सखोल चौकशी होत नाही. मोठय़ा प्रमाणावर संपत्ती गोळा करणाऱ्या कोणाचे ही सरकार बदलून काही वाकडे होत नाही. शेतक-यांना सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली देशोधडीला लावून अशा प्रकल्पातून कोटय़वधींची माया संपादन करणा-यांवर सरकार काहीच बडगा उगारत नसेल तर सरकार नेभळट आहे असे खदाने म्हणावे लागेल. कुठल्याही सरकारची विश्वासार्हता शिल्लक राहिलेली नाही, परंतु टगे मोकाट राहात आहेत असा घणाघाती हल्ला खासदार भोसले यांनी केला आहे.
जलसंपदा विभागातील सर्व बेकायदा बाबींची चौकशी केली तर खातेच बंद करावे लागेल अशा अर्थाची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, यापूर्वीपासून आम्ही जलसंपदा विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगितले होते. हम करेसो कायदा ही वृत्ती जलसंपदाची पोतडी भरून घेणारा कारभार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आवाज उठवला होता, पण गेंडय़ाच्या कातडीचे काही लोक शासन चालवत होते म्हणून त्याचा काही परिणाम झाला नाही. सिंचनाचे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत. शेतकरी, दुष्काळग्रस्तांना पाणी मिळाले नाही. पण नतद्रष्ट राज्यकर्त्यांना त्याचे सोयरसुतक नव्हते. विस्थापितांचे ५० वष्रे झाले तरी पुनर्वसन नाही. भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करणारे आणि सत्ता हातात आल्यावर त्याविरुध्द कारवाई करण्यास का घाबरतात हे न उलगडणारे कोडे आहे. महाजन यांनी फार बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करण्याची धमक दाखवावी अन्यथा सरकार विश्वासार्हता गमावून बसेल. परंतु जनता त्यांना माफ करणार नाही असे भोसले म्हणाले. पुढील आठवडय़ात कृष्णा खोऱ्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.