आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर झालेले आरोप त्रास देणारे असून, असे आरोप पुन्हा झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत. संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता आज येथे दिला.
सांगली येथे एका जाहीर कार्यक्रमात आव्हाड यांनी भिडे गुरुजी यांच्यावर मिरज दंगल घडविल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उदयनराजे यांनीही एक पत्रक प्रसिद्धीस देऊन आव्हाडांवर ही टीका केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे, की संभाजीराव भिडे गुरुजी हे आम्हा सर्वासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे कार्य हे मोठे आहे. त्यांच्यावर कुठल्याही व्यासपीठावरून अशा भाषेत आरोप करणे आम्ही कदापिही सहन करणार नाही. यापुढे असे घडल्यास त्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे.
सांगलीत संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेवरही उदयनराजे यांनी नाव न घेता टीका केली आहे. अशा संस्थांनी आपल्या उद्दिष्टांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यक्रम जरूर करावेत, पण अशा कार्यक्रमांमधून कुठलीही व्यक्ती, जात, धर्म किंवा समाजावर ही अशी खालच्या पातळीवरील टीका अतिशय चुकीची आहे. यामुळे सामाजिक एकोप्याला बाधा येत आहे. हे असे प्रकार यापुढेही सुरू राहिल्यास त्याला आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करू, असा इशाराही उदयनराजे यांनी शेवटी दिला आहे.