राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील ज्येष्ठ वकील व प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संपतराव बापूनाना कडू (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
‘महानंद’च्या संचालिका व कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचतगट संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता कोल्हे यांचे ते वडील व संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे सासरे होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सात्रळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.
संपतराव कडू हे जुन्या काळातील कायदे पदवीधर होते. त्यांना या अभ्यासातील सुवर्णपदक मिळाले होते. त्यांचे शिक्षण नगर व पुणे येथे झाले. इंग्रजी व मराठी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे ते वर्गमित्र होते. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारीच होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार बाळासाहेब विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकरराव पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते आदींनी शोक व्यक्त केला.