ग्राहकांना बँक शाखांमध्ये देयक न भरण्याचे आवाहन

शेतकरी आणि शिक्षक वर्गाच्या असंतोषाला तोंड देणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आता महावितरण कंपनीने अविश्वास दाखविला आहे. वीज देयक भरणा प्रक्रियेबाबतच्या करारनाम्यातील अटींचे जिल्हा बँकेने उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. यामुळे वीज ग्राहकांनी तुर्तास जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये देयक भरू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीज बिल भरणा प्रक्रियेबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. मात्र जिल्हा बँकेने करारातील अटींचे उल्लंघन करीत मागील पावणे दोन महिन्यांपासून ग्राहकांनी त्यांच्या वीज देयकापोटी भरलेले पैसे महावितरणच्या बँक खात्यात भरलेच नाहीत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणने चौकशी सुरू केली आहे.

यामुळे तुर्तास ग्राहकांनी त्यांच्या वीज देयकाची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत भरू नये, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, शहर विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांनी केले आहे.

दरम्यान, निश्चलनीकरणानंतर जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप न केल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले होते. शिक्षकांचे वेतनही काही महिन्यांपासून बँक देत नसल्याने आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या घडामोडीत महावितरणच्या देयकांचे पैसेही बँकेने भरणा न करता वापरल्याचे समोर आले आहे.

भरण्यासाठी अन्य पर्याय वापरा

जिल्हा बँकेने त्यांच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा केल्याबाबतच्या पावत्या महावितरणकडे दिल्या आहेत. बँकेने ही रक्कम महावितरणच्या मुख्यालयाच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक होते. परंतु जिल्हा बँकेने ग्राहकांकडून जमा केलेले पैसे महावितरणच्या खात्यात भरलेले नाहीत. ग्राहकांनी देयके भरण्यासाठी नजीकच्या इतर पर्यायांचा वापर करावा असे महावितरणने म्हटले आहे.