एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांत अमरावती विभागातील ८ आगारांमधील सुमारे ४  हजारांहून अधिक लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाचे गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एसटी महामंडळातील कर्मचारी संघटनांनी गेल्या मंगळवारपासून विविध मागण्यांसंदर्भात संप पुकारला आहे. अमरावती विभागातील ८ आगारातून दररोज ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर सुमारे १ हजार १७० फेऱ्या होत असतात. दररोज या फेऱ्यातून सुमारे ३५ लाख रुपयांचा महसूल एसटीला मिळत असतो. तसेच दिवाळीच्या पूर्वसंध्येला महसूल ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला प्रवाशांची संख्या रोडावते. पण, दिवाळीच्या पाडव्यापासून आठवडाभर प्रवाशांची गर्दी वाढते. गेल्या चार दिवसांमध्ये ४ हजार ६८० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळीच्या हंगामात विविध मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता जादा एसटी बसेस सोडण्यात येतात. मात्र, ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सर्वच्या सर्व ८ आगारांमध्ये बसगाडय़ांची चाके थांबल्याने हा १ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. प्रवाशांचे हाल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप शुक्रवारीही सुरू होता. सलग चौथ्या दिवशीही हजारो प्रवाशांना संपाची झळ पोहचली. एकीकडे अमरावती, अचलपूरसह जिल्ह्यातील सर्व मोठय़ा बसस्थानकांमध्ये शुकशुकाट असताना दुसरीकडे रेल्वेस्थानके प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. एसटी कर्मचारी संपावर असल्याने अमरावती बसस्थानक परिसरातून खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी अनेक ठिकाणांसाठी प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खासगी वाहतूक व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात झाली आहे. या वाहतूकदारांच्या मनमानी कारभारावर पोलीस आणि परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. बसस्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. बसस्थानकातील मोकळया मैदानात एसटी कर्मचारी आणि विक्रेत्यांनी ठिय्या मांडला होता. अमरावतीसह जिल्ह्यातील बसस्थानकांच्या परिसरात अनेक किरकोळ व्यावसायिकांची दुकाने आहेत. एसटी कर्मचारी संपाचा परिणाम या विक्रेत्यांवरही झाला आहे. रिक्षा व्यावसायिकांनाही या संपाची झळ पोहचली आहे. दुसरीकडे, रेल्वेगाडय़ांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. दिवाळीत आरक्षण आधीच हाऊसफुल्ल झाले होते. त्यातच आता तात्काळचेही आरक्षण मिळेनासे झाले आहे. अमरावती शहरातून पुण्यात स्थायिक झालेले नोकरदार दिवाळी सणानिमित्त गावी येतात. संपाची झळ या नागरिकांनाही बसली आहे. ट्रॅव्हल्सचे दर आवाक्याच्या पलीकडे गेलेले आहेत. जे आधी पोहचले. त्यांना आता परतीच्या प्रवासाची चिंता भेडसावू लागली आहे. अशा वेळी रेल्वेने विशेष गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.