राज्य परिवहन मंडळाच्या संपाचा शुक्रवारी चौथा दिवस असून औरंगाबाद जिल्ह्यात या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवत औरंगाबाद विभागातील आगार क्रमांक दोनच्या कर्मचाऱ्यांनी सामुदायिक मुंडण आंदोलन केले. सातवा वेतन आयोग आणि पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी या मागणीसह हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्य बस स्थानकाच्या आवारात ऐन दिवाळीतच मुंडण आंदोलन केले. संघटनांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली. दिवाकर रावते यांच्या हट्टी भूमिकेमुळेच संपातून तोडगा निघत नसल्याची प्रतिक्रियाही कर्मचारी देत आहेत.

वेतन करार आणि हक्काने मिळणाऱ्या सवलतींपासून कामगारांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे असूनही महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग लागू का झाला नाही? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. औरंगाबादप्रमाणेच मुंबईतील परळ डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले.