कोणी कितीही टिवटिव केली, कावकाव केली तरी मुक्ताईचा आशीर्वाद पाठीशी असल्याने आपण नििश्चत आहोत. लहानपणापासून आपण मुक्ताई देवीच्या यात्रोत्सवास उपस्थित राहात आलो आहोत. त्यामुळे यंदाही देवीच्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आलो आहोत. मंत्रिमंडळाच्या बठकीपेक्षा आपणास हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटतो, अशी प्रतिक्रिया सध्या विविध आरोपांच्या घेऱ्यात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

सोमवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले जाते. मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित न राहता आणि लाल दिव्याची गाडी न वापरता त्यांनी खासगी गाडीने जळगावचा रस्ता धरल्याने विविध प्रकारची चर्चा रंगली. त्या संदर्भात येथे प्रतिक्रिया व्यक्त करताना खडसे यांनी आपल्यासाठी मुक्ताई देवीच्या सोहळ्याचे असलेले महत्व मांडले.