मुक्तिसंग्रामदिन मराठवाडय़ात सर्वत्र उद्या (बुधवारी)साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजवंदन होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्तिलढय़ातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले जाईल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मुक्तिसंग्रामाच्या सोहळय़ानिमित्त मुख्यमंत्र्यांचे भाषण मात्र होणार नाही.
निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबरला हैदराबाद संस्थान मुक्त झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला हा लढा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जातो. सन १९४८मध्ये पोलीस कारवाईत मराठवाडय़ाची निजामाच्या जोखडातून सुटका झाली. या दिनानिमित्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी मराठवाडय़ातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. १७ सप्टेंबर हा दिवस केवळ मराठवाडय़ासाठी नव्हे, तर देशासाठी ऐतिहासिक आहे. या दिवशी मराठवाडा देशाचा भाग बनला. या लढय़ात सहभागी असलेल्या हौतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.
या दिनानिमित्त मराठवाडय़ात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम’ या विषयावर सकाळी साडेदहा वाजता व्याख्यान होईल. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. भगवानराव देशपांडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल, सुधाकर देशमुख आजेगावकर, चंदाताई जरीवाला यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
स. भु. करंडक वादविवाद स्पर्धा
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनानिमित्त व स. भु. शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून राज्यपातळीवरील स. भु. करंडक वादविवाद स्पर्धा १९ व २० सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात ही स्पर्धा होईल. ‘नैसर्गिक असमतोलास मानवी हव्यास कारणीभूत आहे’ हा स्पर्धेचा विषय आहे. इयत्ता बारावी ते पदव्युत्तर वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. विजेत्या संघास बक्षीस ७ हजार रुपये, सुवर्ण करंडक व प्रमाणपत्र, दुसरे ५ हजार रुपये, रौप्य करंडक व प्रमाणपत्र आणि तिसरे ३ हजार रुपये, ताम्र करंडक व प्रमाणपत्र देण्यात येईल. याशिवाय वैयक्तिक ३ हजार, २ हजार, १ हजार, उत्तेजनार्थ ५०० रुपयांची दोन बक्षिसे आहेत. पुस्तकरूपातही ५ उत्तेजनार्थ बक्षिसे असून, यातील दोन बक्षिसे कनिष्ठ महाविद्यालयासाठी राहतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाला येण्या-जाण्याचे बसचे व रेल्वेचे सर्वसाधारण भाडे दिले जाणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास-भोजनाची व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे.
लातूरला ध्वजवंदन
लातूर- हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनानिमित्त टाऊन हॉल मदानावर हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे उद्या (बुधवारी) सकाळी ९ वाजता शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते ध्वजवंदन होऊन स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.