९०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अहमदनगरमधील एक पतपेढी आयकर विभागाच्या रडारवर आहे. फेब्रुवारी २०१५ ते मार्च २०१७ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असून यात कर बुडवण्यात आल्याचा संशय आहे.

अहमदनगरमध्ये ज्ञानेश्वरी मल्टी स्टेट अर्बन सहकारी पतपेढी असून ही पतपेढी २०१३ मध्ये सुरु करण्यात आली होती. या पतपेढीच्या मुंबई आणि मध्य प्रदेशमधील इंदौरसारख्या शहरांमध्येही शाखा आहेत. या पतपेढीमधून गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पतपेढीमधील व्यवहारांचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पतपेढीमधील ५८ जणांचा खात्यांमध्ये पैशे जमा झाले. पण ही खाती बोगस असावी असा दाट संशय आहे. बोगस व्यक्ती किंवा कंपनीच्या नावे खाते उघडून हे व्यवहार केले असावेत असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आयकर विभागाने पतपेढीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी आणि शाखांमध्ये छापे टाकले असून या छाप्यांमध्ये काही कागदपत्रही हाती लागली आहेत. यातून पतपेढीमध्ये काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याचा दाट संशय येतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मनोरंजन, ज्वेलरी अशा विविध क्षेत्रातील मंडळी आणि कंपनींचा यात सहभाग असू शकतो असे संबंधीत अधिकाऱ्याने आवर्जून सांगितले.

‘इंडियन एक्सप्रेस’ने पतपेढीच्या मुंबईतील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मुंबईतील झवेरी बाजार शाखेतील व्यवस्थापक निलेश कांबळे म्हणाले, आयटी विभागाने आमच्या शाखांमध्ये फक्त येऊन फक्त सर्व्हे केला. त्यांना पतपेढीतील पदाधिकाऱ्यांची माहिती हवी होती. आम्ही आयटी विभागाला सर्व माहिती दिली आहे असे त्यांनी सांगितले. पतपेढीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.