मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी सुप्रीम एअर लाईन्स कंपनीने दर्शविली असून त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. दररोज सकाळ व सायंकाळी चालणारी ही विमानसेवा सुरुवातीला नऊ आसनांची राहणार असून नंतर मागणीनुसार आसन क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दररोज सकाळी आठ वाजता सोलापूरहून तर सायंकाळी पाच वाजता मुंबई येथून विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच याच वेळेत म्हणजे सकाळी आठ वाजता मुंबईहून तर सायंकाळी पाच वाजता सोलापूरहूनही विमानसेवा सुरू होण्याबाबत आपले प्रयत्न असतील, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले. मुंबईत सांताक्रूज विमानतळाऐवजी जुहू येथील विमानळावर विमान उतरेल व तेथूनच उड्डाण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात खासदार मोहिते-पाटील यांनी आयोजित एका बैठकीत मुंबई विमानसेवेची घोषणा केली. या बैठकीस महापौर अलका राठोड, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक  प्रतिनिधी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक संतोष कौलगी, सज्जन निचळ आदी उपस्थित होते. सर्वानी खासदार मोहिते-पाटील यांच्या घोषणेचे स्वागत करीत विमानसेवेला भरघोस प्रतिसाद देण्याची हमी दिली. विमानसेवा सुरू होण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतल्याबद्दल सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष विश्वनाथ करवा यांच्या हस्ते खासदार मोहिते-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यापूर्वी मोहिते-पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांच्याच पुढाकाराने १७ फेब्रुवारी २००८ रोजी किंग फिशर एअर लाईन्स कंपनीमार्फत ७२ आसन क्षमतेची मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. या विमानसेवेला सोलापूरकरांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. सुमारे दीड वर्ष ही विमानसेवा उत्तमप्रकारे सुरू असताना अचानकपणे कोणतेही कारण न देता खंडीत झाली होती. श्रेयवादाच्या राजकारणातून या विमानसेवेला खोडा घालण्यात आल्याचे बोलले जात असताना मोहिते-पाटील यांनी पुनश्च विमानसेवेसाठी प्रयत्न हाती घेतले. विशेषत: लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या प्रयत्नांना गती दिली. त्यांनी सुप्रीम एअरलाईन्स कंपनीचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा करून त्यांना सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी राजी केले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत विमान वाहतूक मार्ग नियंत्रण विभागाच्या महासंचालकाकडून ना-हरकत पत्र प्राप्त झाल्यानंतर लगेचच विमानसेवा सुरू होईल.