मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी शनिवारी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. रखडलेल्या कामाला कंत्राटदाराने ३१ मार्चपूर्वी गती दिली नाही, तर कंत्राटदाराचे कंत्राट काढून घेतले जाईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. मात्र कंत्राटदार अकार्यक्षम असून त्याच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्याची तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरून सेना-भाजपतील मतभेद यानिमित्ताने समोर आले.    मुंबई- गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. पनवेल ते इंदापूरदरम्यानच्या रुंदीकरणाचे हे काम २०१४ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र भूसंपादनाच्या कामात झालेला उशीर आणि ठेकेदाराची अकार्यक्षमता यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहे. ही बाब लक्ष्यात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या वेळी भाजप नेते माधव भंडारी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले यांच्यासह जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते.   कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्याने काम ठप्प असल्याचे सांगितले जात होते. आता मात्र कंत्राटदाराला मार्च २०१६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली पाहिजे. कंत्राटदाराला मार्चअखेपर्यंत तातडीने करावयाच्या ८९ कामांची सूची देण्यात आली असून, ती त्याने कुठल्याही परिस्थितीत ३१ मार्चपूर्वी करणे अपेक्षित आहे. तसेच ३१ मेपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कामात लक्षणीय प्रगती झाली नाही तर ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून यापुढे दररोज होणाऱ्या कामाचा आढावा घेणार असल्याचेही बांधकाममंत्र्यांनी स्पष्ट केले.
भाजपने घेतलेल्या या भूमिकेला शिवसेनेनी मात्र विरोध केला आहे. ठेकेदार अकार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळे दिवसागणिक लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याला मुदतवाढ दिली जाऊ नये, अशी मागणी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. महामार्ग रुंदीकरणाचे जे काम करण्यात आले आहे, त्याचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा, त्यांनी केलेल्या कामाचे पसे थांबवा आणि नवीन चांगल्या कंत्राटदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात करा, अशी मागणी रामदास कदम यांनी या वेळी केली.  मुंबई- गोवा महामार्गाच्या पुढच्या टप्प्याच्या कामाला ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय सुरुवात केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिले .