राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग जालनामार्गेच व्हावा. व्यापारी व औद्योगिक केंद्र असल्याने हा नवीन रस्ता जालनामार्गेच होण्याची गरज असल्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधींची बैठक सोमवारी झाली. त्या वेळी आमदार खोतकर यांनी या बाबत निवेदन दिले. नियोजित सोलापूर-जालना-जळगाव मार्ग लवकर पूर्ण करावा, अनेक वर्षांपासून मागणी असलेला जालना-खामगाव रेल्वेमार्ग टाकावा, ‘डीएमआयसी’ची (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) व्याप्ती जालना जिल्ह्य़ापर्यंत वाढवावी, कृष्णा खोऱ्यातील हक्काचे २१ टीएमसी पाणी मराठवाडय़ास मिळावे, गावातील पाणी गावातच अडविण्यासाठी नद्या व ओढय़ांमध्ये डोह आणि जलसंधारणाची अन्य कामे करावीत, जलआयुक्तालय सुरू करून त्याचे मुख्यालय मराठवाडय़ात करावे, जालना तालुक्यातील हातवन येथील बृहत् लघुपाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तो पूर्ण करावा, ६०० हेक्टपर्यंत सिंचनक्षमता असणारे मराठवाडय़ातील अनेक जुने प्रकल्प दुरुस्त करावेत, जलआराखडा तयार नसताना मंजूर झालेले मराठवाडय़ातील २९ सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याबाबत सकारात्मक विचार करावा आदी मागण्या खोतकर यांनी केल्या.
जायकवाडी प्रकल्पातील संकल्पित उपयुक्त साठा ७६.६८ टीएमसी असताना त्यामध्ये प्रत्यक्षात येणारा उपयुक्त जलसाठा २३.७२ टीएमसी असतो. त्यामुळे या प्रकल्पाचा पाहिजे तेवढा कधीच वापर होत नाही. त्यासाठी जायकवाडीच्या वरच्या भागातील पाण्याचा अर्निबध वापर थांबला पाहिजे. समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र वरच्या भागात पाळले जात नसल्यामुळे जायकवाडीमुळे मराठवाडय़ातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीस नियोजित आराखडय़ानुसार पाणी मिळाले नसल्याकडेही खोतकर यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.