समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलनात शेतकऱ्यांचा इशारा; प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारला महिनाभराची मुदत

‘मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनींवर सरकारचा दरोडा आहे. त्यातून सरकार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. मात्र, असे कदापिही होऊ देणार नाही. सरकारने महिनाभरात हा प्रकल्प रद्द केला नाही तर महाराष्ट्राचा सिंगूर होईल’, असा इशारा देत राज्यातील दहा जिल्ह्य़ांतील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबई-आग्रा महामार्ग अडवून धरला.

समृद्धी महामार्गासाठी पोलीस बळाचा वापर करून जमिनींची मोजणी करण्यास सरकारने सुरुवात केल्याने या प्रकल्पाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रस्तावित प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ भर दुपारी तासभर चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोन कॅमेऱ्यांच्य माध्यमातून संपूर्ण आंदोलनावर पोलिसांची नजर होती. आंदोलकांनी मात्र आज केवळ सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल अशा इशारा दिला.

जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, आमदार महादू बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार निर्मला गावीत, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, विद्याताई वेखंडे, ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे विनायक पवार, बबन हरणे, गोटीराम पवार, दशरथ तिवरे, कॉ. प्रकाश रेड्डी, आदींचा सहभाग होता. ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती अशा प्रकल्पबाधीत दहा जिल्ह्य़ांतील शेतकरी मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. मुंबई-नागपूर शहरांना जोडणारे अनेक प्रशस्त महामार्ग अस्तित्त्वात असताना समृद्धी महामार्गाचा मुख्यमंत्र्यांचा बालहट्ट कशासाठी असा सवालही आंदोलनकांनी उपस्थित केला. मुख्यंमत्र्यांना अनेकांचे भविष्य बघता येत असले तरी शेतकऱ्यांचे भविष्य पाहण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. आम्ही आमचे भविष्य घडविण्यास समर्थ आहोत. केवळ समृद्धीच्या नावाखाली आमच्या जमीनीवर दरोडा टाकून त्या अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला.

निवृत्तिवेतनासाठी आंदोलन?

आंदोलात सहभागी झालेल्या काही महिलांना हे आंदोलन नेमके कशासाठी आहे याची कल्पनाच नव्हती. माझा मुलगा अपंग असून, आता माझेही वय झाले आहे. त्यामुळे मुलाला निवृत्तिवेतन मिळावे म्हणून आपण प्रयत्न करीत असून त्यासाठीच आंदोलन असल्याचे एका महिलेने सांगितले. आणखी काही महिलांनीही निवृत्तिवेतनासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. तर सरिता मोरे या महिलेने मात्र पोलिसांनी आमच्या शेतात येऊन आमच्यावर लाठीमार केला त्याचा जाब विचारण्यासाठी आल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या हातावर तुरी!

तुरीला द्यायला पैसै नाहीत. बारदान खरेदीला पैसे नाहीत, शेतकऱ्यांची जुनी देणी देण्यास पैसे नाहीत अशा विश्वास गमावलेल्या सरकारच्या पॅकेजवर विश्वास कसा ठेवणार असा सवाल कोपरगाव येथील ज्ञानेश्वर होन आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शेतकऱ्यांनी केला. केवळ जमिनी घेण्यापर्यत सरकार गोड बोलते आणि मग आम्हाला पिढय़ानपिढय़ा सरकारी कार्यालयात खेपा मारायला लावते. त्यामुळे आम्हाला कसलेच पॅकेज नको आणि समृद्धीही नको असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांचा घरचा आहेर

शेतकऱ्याचा संताप आणि शाप कसा असतो याचा अनुभव जुन्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समृध्दीचा हट्ट सोडून द्यावा आणि हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा नाहीतर शेतकरी या सरकारलाही त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तुम्ही फक्त शहापूरमधून होणारा मुंबईचा पाणीपुरवठा रोखा. मी भाजीपाला आणि दूध रोखतो असे आवाहन आंदोलक शेतकऱ्यांना करत, यापुढे सरकारशी चर्चा न करता थेट शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने राज्यभर आंदोलन करण्याचा सूचक इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. समृद्धी प्रकल्प महिनाभरात रद्द झाला नाही तर मुंबईचा पाणीपुवठा तोडण्यात येईल. पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. उलट राज्यभरात अधिक तीव्रतेने हे आंदोलन होईल असे विश्वनाथ पाटील आणि आमदार बरोरा यांनी जाहीर केले.