मुंबई- पुणे रेल्वे प्रवास दिवसागणिक धोकादायक होत असून सोमवारी पहाटे हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याची घटना घडली. यात तीन प्रवासी जखमी झाले असून जखमींवर कर्जतमधील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. शिवप्रसाद मल्लाप्पा हिरेमठ (वय २७, रा. साई वैष्णवी जीएम रोड भांडुप पश्चिम), हुसैनसाब बेलोकी (वय ५९), मोहम्मद असिफ (वय २५ हळदी, हुबळी), अशी जखमींची नावे आहेत. प्राथमिक उपचारानंतर या तिघांनाही कल्याण रेल्वे स्टेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे हुंबळी एक्स्प्रेस सुमारे तासभर रखडली होती.

लोणावळ्यातील खंडाळा घाट या नयनरम्य परिसरातील रेल्वे प्रवास धोकादायक ठरु लागला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली हुबळी एक्स्प्रेस पहाटे साडे पाचच्या सुमारास खंडाळा घाटात पोहोचली. मंकी हिल पॉईंट येथून जात असताना एक्स्प्रेसवर दरड कोसळली. या घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. यापूर्वी १८ जुलै रोजी मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले होते. रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने ही घटना घडली होती. तर या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सह्याद्री एक्स्प्रेसही दरड कोसळल्याने खोळंबली होती.