परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील जि.प.चे माजी अध्यक्ष पंडितराव मुंडे यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. कारखाना निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून मुंडे कुटुंबातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असतानाच उमेदवारी अर्जच बाद झाल्याने आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला आहे.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे या भगिनी कारखान्याची सत्ता कायम ठेवण्यासाठी निवडणुकीच्या मदानात उतरल्या आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पंडितराव मुंडे यांनीही स्वतंत्र पॅनेल उतरवल्याने अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच मुंडे कुटुंबातील सत्तासंघर्ष सुरू झाला. राष्ट्रवादीच्या मुंडे पिता-पुत्र यांच्या अर्जावर जगन्मित्र सूतगिरणीकडील थकीत बाकी व गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते.
मंगळवारी उमेदवारी अर्जावर निर्णय होणार असल्याने तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी मुंडे पिता-पुत्र यांच्यासह १७जणांचे अर्ज बाद झाल्याचा निर्णय दिला. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी भाजपच्या मंत्र्यांनी सत्तेचा गरवापर करीत निवडणुकीपूर्वीच उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप केला. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.